सावधान..हाफ पँट किंवा लुंगी घालून वाहन चालविल्यास चौपट दंड!

वाहन चालवणाऱ्यांसाठी आता विशेष ड्रेसकोड लागू होणार आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये बरमुडा, शॉट्स, हाफ पँट किंवा लुंगी घालून वाहन चालवल्यास नव्या वाहतूक नियमावलीनुसार 2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. लखनऊच्या वाहतूक खात्याकडून हा नियम जारी करण्यात आला आहे. अवडज किंवा चारचाकी वाहने चालवणाऱ्यांना या नियमांचे पालन करावे लागेल. या नियमांप्रमाणे ड्रेसकोड नसेल तर नव्या वाहतूक नियमांनुसार दंड आकारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नव्या वाहतूक नियमानुसार वाहने चालवणाऱ्यांसाठी पँट, शर्ट आणि बुट घालणे आवश्यक आहे. त्यामुळे या ड्रेसकोडव्यतिरिक्त इतर कपडे घातल्यास दंड आकारण्यात येईल असे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे. देशात नवी वाहतूक नियमावली लागू झाली आहे. दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवल्याने या नियमावलीविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. सोशल मिडियावर यावर विविध प्रकारे मते नोंदवण्यात येत आहेत. सर्व स्तरातून या नियमावलीविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच आता लखनौमध्ये वाहनचालकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आल्याने या नाराजीत आणखी भर पडली आहे.

आपल्याला वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. या नियमांचे सर्वांनी पालन करावे आणि या कायद्याचा सन्मान करावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. तसेच कायद्याचा सन्मान करत प्रत्येकाने नियमांचे पालन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. 1 सप्टेंबरपासून ही नवी नियमावली लागू झाली आहे. वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच अशी नियमावली आणावी लागली असे त्यांनी स्पष्ट केले. दंडाची रक्कम वाढवण्याची सरकारची इच्छा नव्हती. मात्र, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी ही पावले उचलण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या नव्या नियमावलीविरोधात विविध संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. ट्रान्सपोर्ट युनियन, टॅक्सी युनियनसह अनेक संघटनांनी नव्या नियमावलीविरोधात आवाज उठवला आहे. मात्र, या नियमावलीवर सरकार ठाम असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या