
रात्रशाळांसाठी शालेय शिक्षण विभाग लवकरच नवे धोरण आणण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रात्रशाळेत शिकविणाऱ्या दुबार शिक्षकांना कमी करून त्याऐवजी अर्धवेळ शिक्षकांना तसेच संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना रात्रशाळेत नियुक्ती करण्यासंदर्भात 17 मे 2017 रोजी शासन निर्णय जारी केला. या निर्णयामुळे रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना विषयनिहाय तज्ञ शिक्षक मिळणे दुरापास्त झाले. त्यामुळे या शासन निर्णयावर पुनर्विचार करून रात्रशाळांबाबत परिपूर्ण धोरण ठरविण्यासाठी शिक्षण विभागाने समितीची स्थापना केली आहे. वर्षा गायकवाड या समितीच्या अध्यक्षा तर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे उपाध्यक्ष असतील. शिक्षक आमदार विक्रम काळे, कपिल पाटील, विलास पोतनीस, ज. दि. आसगावकर, मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शालेय शिक्षण सहसचिव इ.मु.काझी हे सदस्य आहेत.



























































