
‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला सगळ्यांचा लाडका ‘राणादा’ म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. नुकतीच ही मालिका भेटीला आली असून यात तो सिद्धार्थ नावाच्या तरुणाची भूमिका साकारतोय. मालिकेतील त्याच्या हटके लूकचीदेखील चर्चा आहे. यानिमित्ताने मारलेल्या गप्पांमध्ये राणा हा खूप इमोशनल होता त्याउलट सिद्धार्थ हा खूप प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे विरुद्ध टोकाची भूमिका निभावताना थोडसं दडपण असल्याचे हार्दिकने सांगितले.
‘तुझ्या माझ्या संसाराला…’ या मालिकेत सिद्धार्थ हा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढलेला आहे. त्याच्या घरचं वातावरण पारंपरिक आहे. त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. या भूमिकेविषयी हार्दिक म्हणाला, मला जेव्हा या भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा मी नाही बोलूच शकलो नाही. कारण राणामुळे माझी तयार झालेली इमेज ही खूप वेगळी आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या भूमिकेसाठी मला विचारल्यामुळे मी लगेचच होकार दिला. सिद्धार्थची भूमिका साकारण्याचे दडपण होते का याबाबत विचारल्यावर तो म्हणाला, नक्कीच थोडंसं दडपण आहे. अजूनही प्रेक्षक मला राणा म्हणून ओळखतात आणि त्याच नावाने हाक मारतात. त्यामुळे सिद्धार्थ म्हणूनदेखील माझी ओळख व्हावी यासाठी मी प्रयत्न करतोय. त्यासाठी भूमिकेची देहबोली, दिसणं, बोलणं याकडे मी खूप लक्ष देतोय. प्रेक्षकदेखील राणासारखंच सिद्धार्थवरपण प्रेम करतील असा मला विश्वास आहे.


























































