मेट्रो धावताना रुळांवरील कंपन कमी करण्यासाठी अद्ययावत स्लीपर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 ने मुंबईकरांचा भुयारी प्रवास अधिक सुखकर होणार आहे. मुंबई मेट्रो रेल महामंडळाने सोनविले या स्विस कंपनीच्या मशिनच्या सहाय्याने हाय व्हायब्रेशन अटेन्युएशन बुटेड ट्विन स्लीपर बॉक्सची निर्मिती सुरू केली आहे. या स्लीपर ब्लॉक्समुळे गाडी रुळावरून धावताना रुळांचे कंपन कमी प्रमाणात होणार आहे.

ही ट्रॅक यंत्रणा अद्ययावत आहे. वडाळा येथे स्लीपर ब्लॉक्सची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारचे ट्रक्स हिंदुस्थानात प्रथमच वापरले जाणार आहेत. मेट्रो ट्रक्सची सर्वसाधारण कंपन शोषण क्षमता 22 व्हीडीबी इतकी आहे. या अद्ययावत स्लीपर ब्लॉक्समुळे ती आणखी कमी होणार आहे.

मेट्रो ही वेगवान असल्याने ती ट्रॅकवरून धावताना मोठय़ा प्रमाणात कंपन होते. मेट्रो मार्गालगत अनेक जुन्या इमारती, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, स्टुडियो आदी असल्याने हे कंपन कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. मेट्रो-3 या संपूर्ण प्रकल्पाला 2 लाख 1 हजार 600 इतके स्लीपर ब्लॉक्स लागणार असून महिन्याला बारा हजार स्लीपर ब्लॉक्सची निर्मिती करण्याची स्विस मशीनची क्षमता आहे. लवकरच आणखी एक असे मशीन उपलब्ध होणार आहे.