तिलारीच्या जंगलात नव्या प्रजातीची केसाळ गोगलगाय, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

कोल्हापूर जिह्यातील तिलारी येथील निमसदाहरित जंगलामध्ये नवीन प्रजातीच्या केसाळ गोगलगायींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश आले आहे. याचा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे. फाऊंडेशनने यापूर्वीही अनेक दुर्मिळ प्रजातींचा शोध लावून देशविदेशातून वाहवा मिळवली आहे.

लहान गोगलगायी निसर्गाचा अनमोल ठेवा आहेत. त्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात. गोगलगायीसारख्या आकाराने लहान प्रजाती संशोधनाच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून अशा प्रजातींच्या संशोधनावर भर दिला जाईल. – तेजस ठाकरे, प्रमुख संशोधक, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन

गोगलगायीच्या नवीन प्रजातीचे शास्त्राrय नामकरण प्रसिद्ध जपानी ऑनिमेटर, चित्रपट निर्माते आणि स्टुडिओ घिबलीचे सह-संस्थापक हायाओ मियाझाकी यांच्या नावावरून ‘लॅगोकाईलस हायाओमियाझाकी’ असे करण्यात आले आहे. हायाओ मियाझाकी यांचे चित्रपट मानव आणि निसर्ग यांच्यातील नातेसंबंध अतिशय सुंदर रीतीने साकारतात. याच विशेष गुणांचा सन्मान म्हणून त्यांच्या नावावरून गोगलगायीच्या नवीन प्रजातीचे शास्त्राrय नामकरण केले आहे. संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक डॉ. अमृत भोसले, तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, स्वप्नील पवार, राजराता विद्यापीठ श्रीलंकाचे संशोधक डॉ. दिनारझार्दे रहीम यांनी सहभाग घेतला. पश्चिम घाटातील गोगलगायींबद्दल आतापर्यंत तुलनेने कमी संशोधन झाले आहे. ही प्रजाती जैवविविधतेसाठी महत्त्वाची असून तिचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. स्थानिक परिसंस्थेमध्ये या नवीन प्रजातीची भूमिका समजून घेण्यासाठी गोगलगायींवर आणखी संशोधन करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक डॉ. अमृत भोसले यांनी दिली.

लॅगोकाईलस कुळाची पश्चिम घाटातील पहिली नोंद

  • ‘लॅगोकाईलस हायाओमियाझाकी’ ही लॅगोकाईलस कुळाची उत्तरेकडील पश्चिम घाटात आढळलेली पहिली नोंद आहे, ज्यामुळे या कुळाचा ज्ञात विस्तार तब्बल 540 किमीने वाढला आहे. तिच्या अढळ क्षेत्रावरून ‘तिलारी हेरी स्नेल’ असे कॉमन इंग्रजी नाव ठेवण्यात आले आहे.
  • पश्चिम घाटातील जंगलात पालापाचोळय़ात आणि दगडांवर लहान गोगलगायींचा अधिवास आढळतो. या गोगलगायींचा अधिवास अत्यंत मर्यादित असून जंगलातील वणव्यांमुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊन त्या नामशेष होण्याची शक्यता आहे.