
‘‘सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी नेमका मंगळवार आलाय. पण चिंता नको भाई! रात्री 12 च्या ठोक्यानंतरच करू सुरुवात. नववर्षाचे स्वागत करत रिचवू पेगवर पेग. पहिल्याच दिवशी होऊन जाऊ दे जल्लोष’’ अशी चर्चा मुंबईच्या नाक्यानाक्यांवर, गल्लीबोळांमध्ये ऐकायला मिळतेय. 2019 ला बाय बाय करून 2020 च्या स्वागतासाठी मुंबापुरीची तरुणाई सज्ज झाली आहे.
31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस. मध्यरात्रीनंतर नवे वर्ष सुरू होते. सरत्या वर्षाला निरोप देण्यास आणि नवीन वर्षातील नवे संकल्प घेऊन नववर्षाचे स्वागत केले जाते. त्यासाठी अनेकांनी मुंबईबाहेर जाणे पसंत केले असले तरी अनेकांनी मुंबईतच थर्टी फर्स्टचे प्लॅनिंग केले आहे. हॉटेल्स, मॉल्स सजले आहेत. ऑर्केस्ट्रा बार, हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. प्रेक्षणीय स्थळांवर नववर्षाच्या जल्लोषासाठी जय्यत तयारी झाली आहे. पण तिथे जाणे जमलेच नाही तर आपली गच्ची, इमारतीमागची मोकळी जागा, मैदानाचा कोपरा आहेच… असे तरुणाईचे प्लॅन बनले आहेत.
नववर्षाच्या पाटर्य़ांसाठी हॉटेलांचे बुकिंग अगदी फुल्ल आहे, तर दारामध्येच स्वागतासाठी सांताक्लॉजला उभे करून मॉल्स रोषणाईने उजळले आहेत. मॉल्समधील अनेक रेस्टॉरंटनी तर थर्टी फर्स्टसाठी ऑनलाइन ऍडव्हान्स बुकिंग घेतल्याचीही माहिती आहे. एस्सेल वर्ल्डमध्ये मेगानाईटची तयारी पूर्ण झाली आहे. बोरिवलीपासून थेट ठाणे, विरार, कर्जतमधील रिसॉर्टस् आणि वॉटर पार्क हाऊसफुल्ल झाले आहेत.
मुंबईतील प्रेक्षणीय स्थळेही सालाबादप्रमाणे नटूनथटून सज्ज आहेत. गेटवे ऑफ इंडिया नेहमीप्रमाणेच हजारो मुंबईकरांचा जल्लोष पाहण्यासाठी विविधरंगी रंगात नटला आहे. मरीन ड्राइव्ह, जुहू, गोराईसारख्या चौपाटय़ांवरही थर्टी फर्स्टच्या पाटर्य़ा आज रंगणार आहेत आणि या जल्लोषाला गालबोट लागू नये म्हणून पोलीसदादाही ऍलर्ट आहेत.
देवबाप्पा…न्यू इअर ‘हॅप्पी’ असू दे!
झिंगत, नाचत, पाटर्य़ा करत नवीन वर्षाचे स्वागत केले जाते तसेच न्यू इअर ‘हॅप्पी’ असू दे असे गाऱहाणे मांडण्यासाठी थर्टी फर्स्टला देवदर्शनही आवर्जून केले जाते. नवीन वर्षाची सुरुवात त्या कर्त्याकरवित्या भगवंताच्या चरणी लीन होऊन केली जाते. त्यासाठी शिर्डी, अष्टविनायक, जेजुरी, महाबळेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर आदी तीर्थस्थळांतही भाविकांची गर्दी झाली आहे. तेथील धर्मशाळा, हॉटेले हाऊसफुल्ल झाली आहेत.
इथे जाऊया थर्टी फर्स्टला!
गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, जुहू चौपाटी, वर्सोवा चौपाटी, फिनिक्स मॉल, इमॅजिका, आर मॉल, मढ आयलंड, गोराई बीच, एस्सेल वर्ल्ड, अर्नाळा, केळवे माहीम.
प्रभादेवीचे सिद्धिविनायक मंदिर पहाटे 4 वाजता उघडणार
नववर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने करण्यासाठी हजारो भाविक प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मोठय़ा संख्येने गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर श्रींच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिर पहाटे 4.15 वाजल्यापासून खुले करण्यात येणार असल्याचे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने कळविण्यात आले आहे. भाविकांना बुधवारी पहाटे 4.15 ते रात्री 9.45 या वेळेत श्रींचे दर्शन घेता येईल. पहाटेची आरती 5.30 ते 6 या वेळेत होईल. दुपारी 12.05 ते 12.30 या वेळेत नैवेद्य दाखवला जाईल. तर सायंकाळची आरती 7.30 ते 8 या वेळेत होईल. सुरक्षिततेच्या कारणात्सव दर्शनासाठी येताना भाविकांनी लॅपटॉप, कॅमेरा, मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत, असे आवाहन सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.
मदिरालयात वेटिंग… मंदिरात गर्दी
थर्टी फर्स्टसाठी पाटर्य़ा करणाऱयांची मदिरालयांमध्ये वेटिंग आहे, तर देवाची कृपा नव्या वर्षातही कायम राहू दे, अशी प्रार्थना करणाऱयांची मंदिरात गर्दी झाली आहे. पाटर्य़ा करणारे आणि पाया पडणारे प्रत्येकाची हीच इच्छा आहे… न्यू इयर ‘हॅप्पी’च असू दे!



























































