नव्या वर्षात एक लाख टन कांद्याचा बफर स्टॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
onion-market

या वर्षी कडाडलेले कांद्याचे दर बघता पुढच्या वर्षी अशी स्थिती उद्भवू नये यासाठी सरकार तयारीला लागले आहे. केंद्र सरकारने कांद्याचा बफर स्टॉक दुप्पट करीत एक लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने 2019 साठी कांद्याचा 56 हजार टनांचा बफर स्टॉक तयार केला होता, मात्र तरीही वाढत्या किमती रोखण्यास अपयश आले. अनेक शहरांत आजही 100 रुपये किलो या दराने किंवा त्यापेक्षा अधिकच्या दराने कांदा विकला जात आहे. परिणामी सरकारला एमएमटीसीच्या माध्यमातून कांदा आयात करावा लागला. कांद्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीत पुढच्या वर्षी एक लाख टन बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाफेडवर याची जबाबदारी टाकण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.

मार्च ते जुलै दरम्यान रब्बी हंगामात येणारा कांदा नाफेड खरेदी करेल. हा कांदा जास्त दिवस टिकतो.
कांदा उत्पादक जिह्यात लांबलेला पाऊस आणि त्यानंतर आलेला अवकाळी पाऊस यामुळे 2019 मध्ये खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन 26 टक्के घटले. परिणामी कांद्याचे भाव वाढले.
सरकारकडे असलेला बफर स्टॉक केव्हाच संपलेला आहे. कांद्याच्या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने आयात केलेल्या कांद्याची विक्री सुरू केली आहे.