
कोरोनामुळे नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर न पडलेल्या लोकांनी आपल्या प्रियजनांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप व्हॉइस आणि व्हिडीओ काॅलचा पर्याय स्वीकारला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला व्हॉट्सअॅपवर शुभेच्छांचा महापूर नोंदविला गेला असून जगभरातील 140 कोटीहून अधिक युजर्सनी व्हॉइस आणि व्हिडीओ काॅलच्या माध्यमातून आपल्या प्रियजनांशी संपर्क साधला आहे.
फेसबुकने याविषयी एक पोस्ट शेअर केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत नववर्षाच्या पूर्वसंध्येला व्हॉट्सअॅप काॅलिंगमध्ये 50 टक्क्यांची वाढ झाल्याचे म्हटले आहे. याचे पूर्ण श्रेय कोरोनाच्या प्रादुर्भावाला जात असल्याचा उल्लेखही फेसबुक पोस्टमध्ये आहे.
फेसबुक, इन्स्टावर साडेपाच कोटींहून अधिक ब्रॉडकास्ट
31 डिसेंबरच्या रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर साडेपाच कोटींहून अधिक लाइव्ह ब्रॉडकास्ट करण्यात आले. अमेरिकेत वर्षाचा शेवटचा दिवस मेसेंजर ग्रुप काॅलसाठी (तीनपेक्षा जास्त युजर्स) सर्वात मोठा होता. इतर दिवसांच्या तुलनेत या दिवशी दुप्पट ग्रुप व्हिडीओ काॅल करण्यात येईल.
2020 हे व्हिडीओ काॅलिंगला सर्वाधिक मागणी असणारे वर्ष
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी तसेच एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी लोकांनी व्हॉट्सअॅप काॅलिंगला पसंती दिली. 2020 हे व्हिडीओ काॅलिंगला सर्वाधिक मागणी असणारे वर्ष असल्याचे फेसबुकने सांगितले. युजर्सनी प्रियजनांच्या संपर्कात राहण्यासाठी, त्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी व्हिडीओ काॅलिंगचा वापर केला.
























































