
नेवासा पोलीस ठाण्याच्या कारागृहातील 17 कैदी कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यांना उपचारासाठी नगरला पाठविण्यात आले आहे. मागील वर्षी जून महिन्यातही 22 आरोपींना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळीही 47 आरोपींची चाचणी करण्यात आली होती.
नेवासा येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत 60, तर पोलीस कोठडीत दहा आरोपी आहेत. येथील कारागृहात पाच बराकी असून, त्याची क्षमता 25 आरोपींची आहे. या पाच बराकी क्षमतेपेक्षा जवळपास तिप्पट आरोपी ठेवले जात आहेत. 24 जुलै रोजी कारागृहातील काही आरोपींना त्रास जाणवू लागल्याने सर्व 70 आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील 17 आरोपी कोरोनाबाधित आढळून आले असून, यामधील नेवासा पोलीस ठाण्यातील दहा, सोनई पोलीस ठाण्यातील सहा व शिंगणापूर पोलीस ठाण्यातील एका आरोपीचा समावेश आहे. या 17 बाधित आरोपींपैकी 15 जणांना नगर येथे पाठविण्यात आले असून, एकाला नेवासा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. एक आरोपी पोलीस कोठडीत असल्याने त्याला वेगळ्या बराकमध्ये ठेवण्यात आले आहे.

























































