
लग्न हा आयुष्यामधला एक महत्त्वाचा टप्पा असतो. पण अनेकदा लग्नात अचानक काही विघ्न येतात आणि लग्न मोडू शकतं. मग ते ठरवून केलेलं लग्न असेल नाहीतर प्रेमविवाह. अशीच काहीशी घटना उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे घडली आहे.
येथील एका लग्नघरात माप ओलांडण्यावेळी नववधूने आपल्या नवऱ्याच्या कानशिलात भडकावल्याने खळबळ माजली आहे. हे प्रकरण जौनपूर येथील खुटहन येथील आहे. येथील एका तरुणाचा विवाह जवळच्याच एका गावातील तरुणीशी ठरला होता. हा प्रेमविवाह असल्याची माहिती मिळत आहे.
लग्नावेळी वधुने शांततेने सर्व विधी पार पाडले. दुसऱ्या दिवशी तिची पाठवणी करण्यात आली. पाठवणी करून जेव्हा नववधु सासरी पोहोचली, तेव्हा माप ओलांडण्याचा विधी झाला. त्या वेळी नववधुने आपल्या नवऱ्याला जोरदार थप्पड लगावली.
तिच्या या वागण्यामुळे सगळेच अवाक झाले. नववधु तेवढ्यावरच थांबली नाही. तिने वधुचा पोशाख उतरवला आणि साधेसे कपडे परिधान करून परत माहेरी निघून आली. हे प्रकरण चिघळलं आणि पोलिसांकडे गेलं. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करूनही ते मिटू शकलं नाही.
गेल्या काही दिवसांमध्ये लग्नात वरवधूंमुळे होणाऱ्या राड्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. या आधीच्या एका प्रकरणातही अशाच प्रकारे हाणामारी झाली होती.




























































