
मी 13 वर्षांची असताना माझ्यावर ट्रम्प आणि एपस्टीन या दोघांनीही अत्याचार केले होते असा धक्कादायक आरोप एका महिलेने केला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने गुरुवारी एफबीआयची (FBI) काही अतिरिक्त कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यात या महिलेची मुलाखत आहे. न्याय विभागाने ही कागदपत्रे सार्वजनिक केल्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे या आरोपांनंतर पुन्हा एकदा ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
या महिलेने मुलाखतीत म्हटले आहे की ती १३ वर्षांची असताना जेफ्री एपस्टीन याने तिची ओळख डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करून दिली होती. या ओळखीनंतर ट्रम्प व एपस्टीन दोघांनीही आपल्यावर लैंगिक अत्याचार केला. ती 15 वर्षांची होईपर्यंत तिच्यासोबत हे प्रकार सुरू होते असे तिने या मुलाखतीत म्हटले आहे.
जेफ्री एपस्टीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंधांवरून यापूर्वीही अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, आता अधिकृत सरकारी कागदपत्रांमधून या मुलाखतींचा तपशील समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर झालेले सर्व प्रकारचे लैंगिक अत्याचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


























































