
लडाखमध्ये 920 मीटर लांबीचा श्योक टनेलचे उद्घाटन
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ ) 125 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे रविवारी उद्घाटन झाले. यामध्ये लडाखमधील दारबुक-श्योक-दौलत बेग ओल्डी रोडवर बांधलेल्या 920 मीटर लांबीच्या श्योक बोगद्याचे, गलवान स्मारकाचे तसेच कश्मीर, राजस्थान, चंदिगडसह इतर राज्यांमधील 5000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे देशाला समर्पण केले. श्योक बोगदा अभियांत्रिकीचा एक चमत्कार आहे. हा बोगदा या भागात प्रत्येक हंगामात विश्वसनीय कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
आग्रा – मुंबई महामार्गावर भरधाव वाहनाने चित्त्याला चिरडले
आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर (शिवपुरी लिंक रोड) घाटीगाव सिमरिया वळणावर कुनोमधून पळून गेलेल्या दोन चित्त्यांपैकी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. जंगलातून बाहेर पडून चित्ता रस्त्यावर आला असता एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याला चिरडले. दुसऱया चित्त्याचा शोध सुरू आहे. ही घटना रविवारी पहाटे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. माहिती मिळताच घाटीगाव पोलीस ठाण्याचे पोलीस आणि वन विभागाच्या अधिकारी घटनास्थळी पोहचले. चित्त्याचा मृतदेह कुनो येथे नेण्यात येणार असून तिथे तज्ञांचे पथक शवविच्छेदन करेल.
घरातच नोटांची मशीन टाकली, पाचशेच्या नोटा आल्या बाहेर
मध्य प्रदेशातील नीमच जिह्यात नकली नोटांचे मोठे रॅकेटचे नेटवर्क उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपी ईश्वर खारोल याच्या घरी छापा टाकला तेव्हा काळय़ा रंगाच्या मशीनमधून छापलेल्या हिरव्या पाचशेच्या नोटांचा ढीग पाहिला तेव्हा सर्वांना धक्का बसला. नीमच सिटी पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपये मूल्याच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत. चौकशीत आरोपीने सांगितले की, तो हे नेटवर्क त्याचा एक मित्र सुनील बैरागी याच्या मदतीने चालवत होता. सुनील सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांचे पथक या संपूर्ण टोळीला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
अलास्काजवळ भूकंपाचे धक्के, अमेरिकाही हादरली
अलास्का आणि कॅनडाच्या सीमेजवळ शनिवारी रात्री 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्याने परिसरात मोठी दहशत पसरली. भूकंपाचे जोरदार धक्के दोन्ही देशांच्या सीमेलगतच्या प्रदेशात जाणवले. भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ समुद्र असूनही सुदैवाने अद्याप कोणतीही त्सुनामीची चेतावणी जारी करण्यात आलेली नाही, अशी माहिती स्थानिक अधिकाऱयांनी दिली. अनेक ठिकाणी घरात कपाटातील वस्तू आणि भिंतींवरील सामान खाली पडल्याच्या घटना घडल्या. लोकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली.


























































