
इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलकडून सुरू झालेले हल्ले आणि इराणचे प्रतिहल्ले यामुळे अवघ्या जगावर आर्थिक संकट ओढावले आहे. इराण युद्ध कधी थांबणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच ‘अॅक्सिओस‘ (Axios) ने मोठी बातमी दिली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये ४५ दिवसांच्या युद्धबंदीची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. मात्र अमेरिका, इराण, इस्रायल यांपैकी कुणीही यावर औपचारिक माहिती दिलेली नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागून एक अनेक अंतिम मुदत जाहीर केल्या असतानाच, वॉशिंग्टन, इराण आणि प्रादेशिक मध्यस्थ एका संभाव्य ४५ दिवसांच्या युद्धबंदीवर चर्चा करत असल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.
इराण हादरले! तेहरानमधील रहिवासी भागांवर अमेरिका-इस्रायलचे भीषण हवाई हल्ले; 13 जणांचा मृत्यू
युद्ध रोखण्यासाठी पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्तचे मध्यस्थ या वाटाघाटींमध्ये सहभागी होत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. यामध्ये ट्रम्प यांचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात फोनवरून संवाद होण्याच्या शक्यता मांडण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर हा करार झाला तर तो दोन टप्प्यांत असेल. पहिल्या टप्प्यात ४५ दिवसांची युद्धबंदी असेल, ज्या काळात युद्धाच्या कायमस्वरूपी समाप्तीसाठी पुन्हा एकदा मध्यस्थी केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात पूर्ण युद्धबंदी संदर्भात करार होईल अशी शत्यता या वृत्तात वर्तवण्यात आली आहे.
या हल्ल्यांची सुरुवात २८ फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका-इस्रायली हल्ल्यांनी झाली. त्यानंतर इराणने प्रत्युत्तर देत होर्मुझ सामुद्रधुनी रोखल्याने मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, जर हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) वाहतुकीसाठी खुली गेली नाही, तर इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यात येईल. इतक्या कमी वेळात चर्चा होऊन मार्ग निघेल अशी शक्यता धूसर असल्याचे देखील यावृत्तातून सांगण्यात आले आहे.


























































