
हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे बेलापूर-पनवेलदरम्यान हाल सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य रेल्वेने पश्चिम ‘डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोर’च्या कामासाठी बेलापूर-पनवेलदरम्यान घेतलेला 38 तासांचा ब्लॉक उद्या सोमवारी दुपारी संपणार असला तरी इतर कामांसाठी सोमवारपासून पुढे पाच दिवस म्हणजे शुक्रवारपर्यंत रात्रकालीन ब्लॉक बेलापूर-पनवेलदरम्यान घेण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचा ब्लॉक मध्यरात्री 12.30 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत असणार आहे.
रेल्वेकडून पनवेल येथे लोकल यार्डात स्टॅबलिंग मार्गिका क्रमांक 1, 2, 3, 4 आणि 10 च्या कामासाठी सोमवार, 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत दररोज मध्यरात्री 12.30 ते पहाटे 5.30 वाजेपर्यत ट्रफिक वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या पाच दिवसांच्या ब्लॉक कालावधीत बेलापूर -पनवेलदरम्यानच्या लोकल गाडय़ा रद्द असणार आहेत.
– सीएसएमटी-पनवेल रात्री 10.58 वाजता शेवटची लोकल असणार आहे. तसेच ठाणे-पनवेल शेवटची लोकल रात्री 11.32 वाजता तर पनवेल-ठाणे शेवटची लोकल रात्री 10.15 वाजता असणार आहे.
– ठाणे-पनवेलदरम्यान सकाळची पहिली लोकल सकाळी 6.20 वाजता असणार आहे. पनवेलहून सीएसएमटीसाठी पहिली लोकल पहाटे 5.40 वाजता तर पनेवलहून ठाण्यासाठी पहिली लोकल सकाळी 6.13 वाजता असणार आहे.


























































