
सोमवार, 26 ऑक्टोबर रोजी फरिदाबाद इथे निकीता तोमर नावाच्या तरुणीची तौसीफ नावाच्या तरुणाने गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होऊ लागले आहेत.
तौसीफने पोलीस चौकशीत तो निकीताला शाळेत असल्यापासून ओळखत असल्याचं सांगितलं आहे. तौसीफने निकीताला गोळ्या घालून तिची हत्या करण्यापूर्वी तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्याने तिची हत्या केली होती.
आता पोलीस कोठडीत असलेल्या तौसीफकडून पोलिसांना प्रकरणाविषयी आणखी खुलासे मिळत आहेत. आता तौसीफ याने मिर्झापूर ही वेब सिरीज पाहून निकिताची हत्या केल्याचा खुलासा केला आहे.
मिर्झापूर या वेब सिरीज मधील मुन्ना हे पात्र स्विटी नावाच्या मुलीवर प्रेम करत असतं. पण स्विटी दुसऱ्या माणसाशी लग्न करते म्हणून मुन्ना तिची हत्या करतो, असं दाखवण्यात आलं आहे. मिर्झापूर मधूनच आपण निकिताला मारण्याचा कट रचला अशी कबुली तौसीफ याने दिली आहे.
तौसीफला निकीताशी लग्न करायचं होतं
तौसीफ निकीताला शाळेत असल्यापासून ओळखत होता. तेव्हापासूनच ती आपल्याला आवडायची आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं होतं असं तौसीफने सांगितलं आहे. निकीताला तौसीफ पसंत नव्हता आणि ती त्याच्या पाठलागाला कंटाळली होती. तिने तौसीफच्या फोन कॉलना आणि मेसेजना उत्तर द्यायचं बंद केलं होतं. यामुळे तौसीफचं डोकं फिरलं होतं आणि त्याने निकीताला धडा शिकवायचं ठरवलं होतं.
जेलमधून बाहेर आलेल्या नातेवाईकाकडून मिळवलं पिस्तुल
तौसीफने यापूर्वी 2018 साली देखील निकीताचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने अपहरणास निकीताने विरोध केला तर तिला ठार मारायचं या उद्देशाने कट रचला होता. त्याने त्याच्या एका नातेवाईकाकडून पिस्तुल मिळवलं होतं. त्याचा हा नातेवाईक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असून तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता.




























































