मेसेज आणि कॉलला प्रतिसाद न दिल्याने फिरलं होतं तौसीफचं डोकं

सोमवारी म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी फरिदाबाद इथे निकीता तोमर नावाच्या तरुणीची तौसीफ नावाच्या तरुणाने गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. तौसीफने पोलीस चौकशीत तो निकीताला शाळेत असल्यापासून ओळखत असल्याचं सांगितलं आहे. तौसीफने निकीताला गोळ्या घालून तिची हत्या करण्यापूर्वी तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्याने तिची हत्या केली होती.

तौसीफला निकीताशी लग्न करायचं होतं
तौसीफ निकीताला शाळेत असल्यापासून ओळखत होता. तेव्हापासूनच ती आपल्याला आवडायची आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं होतं असं तौसीफने सांगितलं आहे. निकीताला तौसीफ पसंत नव्हता आणि ती त्याच्या पाठलागाला कंटाळली होती. तिने तौसीफच्या फोन कॉलना आणि मेसेजना उत्तर द्यायचं बंद केलं होतं. यामुळे तौसीफचं डोकं फिरलं होतं आणि त्याने निकीताला धडा शिकवायचं ठरवलं होतं.

जेलमधून बाहेर आलेल्या नातेवाईकाकडून मिळवलं पिस्तुल
तौसीफने यापूर्वी 2018 साली देखील निकीताचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने अपहरणास निकीताने विरोध केला तर तिला ठार मारायचं या उद्देशाने कट रचला होता. त्याने त्याच्या एका नातेवाईकाकडून पिस्तुल मिळवलं होतं. त्याचा हा नातेवाईक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असून तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता.

धर्म परिवर्तनाच्या आरोपांचीही चौकशी
निकीताच्या कुटुंबीयांनी तौसीफ आणि त्याचे कुटुंब निकीताने लग्न करावे यासाठी तिच्यावर आणि कुटुंबावर दबाव टाकत होतं असा आरोप केला आहे. निकीताचे धर्मपरिवर्तन करण्यासाठीही ते जबरदस्ती करत होते असाही आरोपी तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी त्यांच्या या आरोपांबाबतही तौसीफकडे चौकशीला सुरुवात केली आहे. आरोपांत तथ्य आढळल्यास तौसीफचे कुटुंबीय देखील अडचणीत सापडू शकतात. तूर्तात धर्मपरिवर्तनासाठी जबरदस्ती केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलेला नाहीये, मात्र गरज भासल्यास यासंदर्भातील कलमे देखील वाढवली जातील असे पोलिसांनी सांगितले आहे.

तौसीफच्या काकाने बसपाकडून निवडणूक लढवली होती
तौसीफचा काका हा राजकारणात असून त्याने बसपाकडून गेल्यावेळची विधानसभा निवडणूक लढवली होती. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दावा केला आहे की तौसीफने स्वत:ला पोलिसांच्या हवाली करावे असे त्यांनीच सांगितले होते. निकीता ही एक हुशार विद्यार्थिनी होती आणि बीकॉमची परीक्षा देऊन कॉलेजातून बाहेर पडत असताना तिच्यावर तौसीफने गोळीबार केला होता. या गोळीबारात तिचा जागीच मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या