
>> नीलेश कुलकर्णी ([email protected])
दिल्लीचे भाजपचे खासदार आणि पदाधिकारी कामाचे नाहीत, ही दिल्लीतील सामान्य नागरिकांची धारणा आहे. काँग्रेसचे अस्तित्व जवळपास संपलेले आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी ‘आप’चा पर्याय निवडला. दिल्ली महापालिका केजरीवालांनी दणदणीतपणे जिंकली. सामान्य जनतेला सूर्य–चंद्र नको असतात. त्यांना रोटी, कपडा, मकान या तीन मूलभूत गरजा महत्त्वाच्या. याच गरजांची ताकद ओळखून आम आदमी पार्टीने दिल्लीत ‘केजरीवाल पॅटर्न’ राबविला आहे आणि तो यशस्वी ठरला आहे.
दिल्ली महापालिकेत केजरीवालांची सत्ता येऊ नये यासाठी केंद्र सरकारने घाईघाईने कायदा करून तीन महापालिकांची एक महापालिका केली. त्यानंतर ताकदीने निवडणूक लढवली. मात्र इतके करूनही दिल्लीकरांनी भाजपला उताणे पाडले. दिल्लीत पुन्हा केजरीवालांनी बाजी मारली. अर्थात दिल्लीत केजरीवालांना पर्याय नसला तरी हेच गरीबांचे ‘स्वयंघोषित शहेनशहा’ केजरीवाल दिल्लीबाहेर का लटपटतात, हा खरा प्रश्न आहे. केजरीवालांना राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जरूर आहेत, मात्र प्रत्येक राज्यात त्याची सोयिस्कर राजकीय भूमिका आहे. गुजरातमध्ये काहीही होणार नाही, हे माहिती असताना केजरीवालांनी त्वेषाने निवडणूक लढविली. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन काँग्रेसने तब्बल 33 जागा गमावल्या. पुन्हा हेच केजरीवाल हिमाचलमध्ये फिरकलेदेखील नाहीत. तिथे भाजप आणि काँग्रेस यांच्या मतांच्या टक्केवारीत एक टक्क्याच्या फरक आहे. केजरीवालांनी गुजरातमध्ये जसा गाव गोळा केला तशीच राजकीय आदळआपट हिमाचलमध्ये केली असती तर कदाचित भाजप सत्तेत आला असता. मात्र केजरीवालांचे राजकारण हे असे अनाकलनीय आहे.
दिल्ली महापालिका केजरीवालांनी दणदणीतपणे जिंकली. भाजपने विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रातले मंत्री असे तालेवार पुढारी दिल्लीच्या गल्लीबोळात मते मागण्यासाठी पाठवले, मात्र दिल्लीकरांनी त्यांचा ‘झाडू’ने सफाया केला. माफक दरात वीज, पाणी, आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण या आपल्या ‘रोजमर्रा जिंदगी’चा विचार करत जनतेने केजरीवालांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. खरे म्हणजे मदनलाल खुराणा यांच्यानंतर सबंध दिल्लीवर छाप पाडू शकेल, असा नेता दिल्ली भाजपमध्ये निर्माण झाला नाही. डॉ. हर्षवर्धन हे निःसंशयपणे भाजपातले एक सज्जन गृहस्थ आहेत. मात्र नेतृत्व करणे त्यांच्या आवाक्यापलीकडले आहे. भाजपचे गौतम गंभीर नावाचे खासदार मतदारसंघात कमी आणि क्रिकेटच्या मैदानावर जास्त ‘गंभीर’ असतात. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी जनतेसाठी उपलब्ध नसतात. हंसराज हंस हे भाजपचे खासदार आहेत हे बहुधा त्यांनाच माहिती नसावे. मनोज तिवारी आपल्याच भोजपुरी दुनियेत रमलेले असतात तर प्रवेश वर्मा आपल्या दबंगगिरीत रममाण असतात. दिल्लीत सपशेल पराभव होईल, याची भुणभुण असल्याने भाजपचे संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी दिल्लीच्या खासदारांना बोलावून त्यांचे बौद्धिकही घेतले होते. मात्र परिणाम शून्य. मुळात मोदींकडे पाहून दिल्लीकरांनी या खासदारांना निवडून दिले. दिल्लीचे भाजपचे खासदार आणि पदाधिकारी कामाचे नाहीत, ही दिल्लीतील सामान्य नागरिकांची धारणा आहे. त्यात काँग्रेसचे अस्तित्व जवळपास संपलेले आहे. त्यामुळे दिल्लीकरांपुढे पर्यायही नाही. त्यातच काही आघाडीवर केजरीवालांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. सत्येंद्र जैन हे पोलीस कोठडीत असताना आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी ‘सीबीआयचे पाहुणे’ येऊन गेलेले असतानाही दिल्लीकरांनी महापालिका निवडणुकीत ‘आप’लाच पसंती दिली. सामान्य जनतेला सूर्य-चंद्र नको असतात. त्यांना त्यांच्या गरजा महत्त्वाच्या. ‘केजरीवाल पॅटर्न’ हा असा आहे.
सुक्खूंकडून शिका!
हिमाचलचे नवेकोरे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुक्खू हे कामाला लागले आहेत. बस ड्रायव्हरचा मुलगा असलेल्या सुक्खू यांनी हमीरपूरमधून भाजपचे आणि प्रेमकुमार धुमल यांचे साम्राज्य खालसा केले. या सुक्खूंनी सत्तेत आल्या आल्या महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास हिमाचलमधील ‘अटल बोगद्या’चे नाव बदलले जाईल, अशी चर्चा होती. भाजपने नावे बदलण्यात आणि नावे ठेवण्यात पीएचडी केली आहे. मग ती दिल्लीतील रस्त्यांची असो की शहरांची. नावे बदलण्याचा धडाका कायम आहे. दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासाचे नाव ‘7 लोककल्याण मार्ग’ असे करण्यात आले तर राजपथाचे नाव ‘कर्तव्यपथ’ असे ठेवले गेले. अर्थात या कर्तव्यपथावरून किती भाजपाई वाटचाल करतात हा संशोधनाचा विषय. दिल्लीपुरते तरी भाजपाई मंडळी कर्तव्यपथावरून चालले असते तर महापालिका निवडणुकीत पक्षाची दाणादाण उडाली नसती. या नावांच्या बदलाबदलीमुळे सुक्खूही तडकाफडकी अटल बोगद्याचे नाव बदलून राजीव बोगदा वगैरे असे करतील, अशी अटकळ होती. मात्र, सुक्खू यांनी ‘हम अटलजी का सन्मान करते हैं. देश के भूतपूर्व प्रधानमंत्री के प्रति हमे आदर है. अटल बोगदा यही नाम बरकार रहेगा. बीजीपीने इससे कुछ सिखना चाहिये,’ असा टोला लगावत, भाजपला चार चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत.
इच्छुकांचे ‘तारे जमीं पर…’
अवघे एWशी वयोमान, म्हणत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जोशात कामाला लागले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासोबतच राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी असल्याने खरगे संसदेतही विलक्षण व्यस्त असतात. वास्तविक, काँग्रेसच्या उदयपूर अधिवेशनात ‘एक व्यक्ती एक पद’ हा ठराव पारित झाल्याने खरगे विरोधी पक्षनेतेपद सोडतील आणि आपल्या संधी मिळेल, या आशेवर सध्या काही काँग्रेसजन घुटमळत आहेत. पी. चिदंबरम यांनाही हे पद आपल्याला मिळेल अशी आशा आहे तर राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सक्रिय असलेल्या दिग्विजयसिंगांनाही आपल्याला संधी मिळेल, असा आशावाद आहे. उत्तर प्रदेशचे प्रमोद तिवारी यांनाही आपल्याला या पदाची ‘लॉटरी’ लागेल, अशी आशा आहे. मात्र खरगे हे अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद दोन्ही आघाडय़ांवर सध्या मजबुतीने काम करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कर्नाटकच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर दलित नेते असलेल्या खरगेंकडून विरोधी पक्षनेतेपद काढून घेतले तर भाजपवाले कर्नाटकात काहूर माजवतील, अशीही धास्ती काँग्रेस हायकमांडला आहे. त्यामुळे खरगेंच्या राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाला तूर्तास तरी धोका नाही. यामुळे त्यासाठी इच्छुक असलेल्यांचे ‘तारे जमीं पर’ आले आहेत हे मात्र खरे!



























































