दिल्ली डायरी : अरविंद केजरीवालांची ‘आप’बीती!

>>नीलेश कुलकर्णी<<

nileshkumarkulkarni@gmail.com

जहाज बुडू लागल्यानंतर उंदीर बाहेर पडावेत तसे आम आदमी पक्षाचे एकेक संस्थापक सदस्य अरविंद केजरीवाल यांच्या मनमानीविरोधात बंड करून पक्षातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे आपचे नेमके होणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘आपमधील आशुतोष व आशीष खेतान यांनी राजीनामा दिल्यामुळे केजरीवालांवर नवी आपबीती ओढवली आहे. देशातला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडील बौद्धिक दिवाळखोरीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला स्ट्रटेजिकलीसळो की पळो करून सोडण्याची क्षमता केजरीवालांकडे आहे. मात्र दैव देते आणि कर्म नेते अशा रीतीने त्यांनी मिळालेल्या संधीचे यमुनेत विसर्जन केले आहे हे नक्की!

आम आदमी पक्षात सुरुवातीपासूनच अंतर्गत अस्वस्थता दिसून आली आहे. गेल्या काही दिवसांत ती पुन्हा उफाळून येत आहे. आशुतोष आणि आशीष खेतान यांच्यासारख्या त्या पक्षाच्या प्रमुख संस्थापक सदस्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने आपचे राजकीय भवितव्यच पणाला लागणार असे दिसत आहे. ज्या भ्रष्टाचाराविरोधात केजरीवाल यांच्यासह आपच्या मंडळींनी बोंब ठोकली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत न भूतो असा विजय मिळवून सत्ता काबीज  केली त्याच आपमध्ये आणि तेथील सरकारमध्ये भ्रष्टाचार बळावल्याचे उघड आरोप होत आहेत. वास्तविक आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात आप सरकारने चांगले काम केले आहे. परंतु केजरीवाल यांचा एककल्ली  स्वभाव, हुकूमशाही कारभार, सातत्याने नौटंकी करणे, आधी पंगा आणि नंतर माफीनामा, काळे पैसेवाले आणि भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात आश्रय देणे अशा अनेक घोडचुका केजरीवाल यांनीही केल्या आणि त्यांचेही पाय मातीचेच असल्याचे दाखवून दिले. साहजिकच पक्षात आणि जनतेत ते आणि त्यांच्या पक्षाविषयी अविश्वास आणि असंतोष निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्यांचे एकेकाळचे प्रमुख साथीदार त्यांना सोडून जात आहेत.

सत्तेत आल्यानंतर केजरीवाल यांनी हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू केल्यामुळे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषणसारख्या विद्वान सदस्यांनी बाहेरचा रस्ता पकडला. त्यानंतर केजरीवालांचा ‘बंदोबस्त’ करायचाच असे राजकारण भाजपने केल्यामुळे कपिल मिश्रांसारखे आपचे अनेक मासे भाजपच्या गळाला लागले. केजरीवालांना राजकीयदृष्टय़ा खतम करण्यासाठी मोठी ताकद भाजपने गेल्या चार वर्षांत पणाला लावली, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे भाजप नेतृत्व 2019च्या दृष्टीने चिंतातुर असताना  केजरीवालांच्या पक्षाला अचानक जी गळती सुरू झाली आहे ती जेवढी धक्कादायक तेवढी भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व सात जागा जिंकल्या होत्या. मात्र आगामी निवडणुकीत भाजपचा टिकाव लागणे सोपे नाही असे सर्वेक्षण भाजपच्याच सर्व्हेमध्ये आले आहे. अशी प्रतिकूल परिस्थिती असताना आपमधली फाटाफूट भाजपच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. अरविंद केजरीवालांनी अंथरुण पाहून पाय पसरण्याऐवजी उटपटांग राजकारण केल्यामुळे त्यांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे. त्यांनी अजूनही स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणली नाही तर जंतर मंतरपासून सुरू झालेल्या आप नावाच्या सर्कसचा ‘लाफ्टर शो’ व्हायला वेळ लागणार नाही.

खजिनदार अहमद पटेल

ahmed-patel

काँग्रेस अध्यक्ष म्हणून राहुल गांधींचा उदय झाल्यानंतर सोनिया गांधींचे खासमखास असणारे अहमद पटेल यांचे काय होणार? या अनेकांची उत्सुकता ताणलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. राहुल आल्यानंतर अहमदमियांची वळकटी वळून थेट गुजरातमध्येच त्यांची रवानगी होणार अशा स्वप्नरंजनात असणाऱ्या पक्षांतर्गत विरोधकांना धोबीपछाड देत अहमदभाईंनी दिल्लीच्या पडद्याआडच्या राजकारणात अजूनही आपण ‘वस्ताद’ असल्याचे दाखवून दिले आहे. सोनियांचे राजकीय सल्लागार म्हणून दहा वर्षांहून अधिक काळ देशातील सरकारचे पडद्याआडून सूत्रसंचालन करणारे अहमद पटेल राहुल आल्यानंतर राजकारणातून कायमचे पडद्याआड जातील असा कयास लावला जात होता. राहुल व पटेलांचे जमत नाही, टोकाचे मतभेद आहेत अशी कुजबूजही दिल्लीत सर्रास ऐकायला मिळायची. या पार्श्वभूमीवर अहमदभाईंनी काँग्रेसच्या खजिन्याच्या चाव्याच ताब्यात मिळवून आपली ताकद दाखवून दिली  तीही मोतीलाल व्होरांसारख्या निस्पृह खजिनदाराकडून या चाव्या मिळवून. काँग्रेसच्या ‘24, अकबर रोड’ या मुख्यालयात सुट्टीच्या दिवशी एखादे वेळी शिपाई येणार नाही, पण तिथे मोतीलाल व्होरा हमखास वह्यांमध्ये डोके घालून हिशेब तपासत असलेले दिसायचे. कामापेक्षा एकही रुपया अधिक खर्चू न देणाऱ्या व्होरांनी अनेकदा राहुल गांधींनाही खर्चाबाबत समज दिल्याची वदंता आहे. इंदिरा ते सोनिया गांधी या पिढीपर्यंत समर्पित सेवा दिलेल्या व्होरांकडून खजिनदारपदाची जबाबदारी अहमद पटेल यांच्याकडे येणे त्यामुळेच महत्त्वाचे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ‘फंड रेझिंग’ हा महत्त्वाचा विषय राहणार आहे. म्हणूनच सत्तेत नसलेल्या काँग्रेससाठी अहमदभाईंची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

योगी होते कुठे ?

yogi-aditynath

आपल्या देशात कधी कोणत्या विषयाचे राजकारण होईल याचा भरवसा नाही. चोवीस तास राजकारण अनुभवणारा आपला देश आहे.  आता अटलजी अस्वस्थ असताना अटलजींच्याच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कुठे होते यावरूनही भाजपात वादंग सुरू आहे. स्वातंत्र्यदिनादिवशीच अटलजींच्या तब्येतीबाबत चिंतेचा सूर उमटत होता. दुसऱ्या दिवशी दस्तरखुद्द पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळ एम्समध्ये दाखल झाले. अगदी दक्षिणेकडील तामीळनाडू व केरळच्या राज्यपालांनीही तातडीने एम्स गाठले. विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी भेटी दिल्या. मात्र ज्या उत्तर प्रदेशवर अटलजींनी निस्सीम प्रेम केले आणि ज्या उत्तर प्रदेशने अटलजींना भरभरून प्रेम दिले त्या प्रदेशाचे मुख्यमंत्री कुठे होते? असा सवाल केला जात आहे. वास्तविक लखनौवरून दिल्लीत एम्स गाठणे हे योगींसाठी काही मिनिटांचे अंतर होते. मात्र योगींनी एम्समध्ये जाणे जाणीवपूर्वक टाळल्याची टीका आता होत आहे. शिवाय पंतप्रधान मोदी अटलजींच्या अंत्ययात्रेत सामील असताना योगींचा तिथेही वावर दिसला नाही. अटलजी पंतप्रधान असताना त्यांनी योगींना एकदा खडसावले होते. त्याचा राग मनात धरून योगींनी अटलजींच्या बाबतीत बहिष्कार घातल्याची माहिती पुढे आली आहे. योगींचा हा हेकेखोरपणा लक्षात आल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी योगींची तशा दुःखद प्रसंगीही चांगलीच कानउघाडणी केली. त्यामुळेच योगी महाराज हरिद्वारला अटलजींच्या रक्षा विसर्जनावेळी उपस्थित राहिले.