शरद पवारांची भेट घेऊन लंके यांनी ‘तुतारी’ फुंकली, अजितदादांना झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन ‘तुतारी’ फुंकली. यामुळे आपल्या गटाचा आमदारच साथ सोडून गेल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार झटका बसला असून त्यांच्या गटात अस्वस्थता पसरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आमदार लंके अजित पवार गटाबरोबर होते. पण ते लवकरच पुन्हा शरद पवार यांच्याबरोबरच असतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आज लंके यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. त्यानंतर कोविडकाळात आमदार लंके यांना आलेल्या अनुभवावर आधारित ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, दादा कळमकर, प्रताप ढाकणे, राहुल जगताप, आमदार प्राजक्त तनपुरे, प्रशांत जगताप आणि नगर जिह्यातील नेते उपस्थित होते.

साहेब जो आदेश देतील तो मान्य

‘माझे सगळे नेतेमंडळी इथे बसलेले आहेत. मी स्वतःला कार्यकर्ता समजतो. त्यांच्यासमोर कार्यकर्त्याने तशी चर्चा करणे योग्य नाही. पण साहेब (शरद पवार) देतील तो आदेश मला मान्य असेल,’ असे नीलेश लंके यांनी लोकसभेच्या उमेदवारीबाबत विचारले असता सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

लंके यांना सहकार्य – शरद पवार

शरद पवार यांनी आमदार नीलेश लंके यांना जनतेच्या सेवेसाठी आमच्या सर्वांची साथ त्यांच्याबरोबर राहील. यापुढे त्यांना कोणतीही मदत लागली तर निश्चित सहकार्य करू, असे सांगितले. पत्रकारांनी लंके आगामी काळात दिल्लीत दिसणार की मुंबईत, असा प्रश्न केला तेव्हा लंके हे पारनेरमध्ये दिसतील, असे पवार यांनी सांगताच पत्रकार परिषदेत हशा उसळला.

अजित पवार यांना आठवला पक्षांतरबंदी कायदा

अजित पवार स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटले, मात्र आज आमदार लंके यांनी साथ सोडल्यानंतर अजित पवारांना पक्षांतरबंदी कायदा आठवला. बारामती येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, लंके यांनी चुकीची भूमिका घेतल्यास त्यांची आमदारकी धोक्यात येईल. पक्षांतरबंदी कायद्यानुसार आमदारकी रद्द होते.