
>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])
।। श्री गुरुदेव दत्त ।।
“श्री वासुदेव स्वामी आले ब्रह्मवर्त ग्रामे गंगाकिनारी
हे पवित्र ग्राम, स्वामीमहाराज ज्योतिष,
याज्ञीकी वेदान्त योग श्लोक पुराण सांगती,
श्रीगुरूंच्या आज्ञेतुन श्रीदत्तपुराण ग्रंथ रचला स्वामींनी”
।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।
जालवणहुन निघून श्रीस्वामी महाराज ब्रम्हवर्त येथे आले. ब्रह्मवर्त हे गंगा किनाऱ्यातील पवित्र गाव. येथे पेशव्यांनी बांधलेले ब्रह्मेश्वराचे मंदिर आहे. अंबाजीपंतांच्या घाटावर श्रीराममंदिराजवळ एका जुन्या झोपडीत श्री स्वामी महाराज राहत असत. गंगाकिनारी याचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे संन्याशाने कितीही दिवस राहिले, तरी दोष नसतो. तीन दिवस राहण्याचा नियम गंगाकिनारी पाळला नाही तरी चालतो. रोज सकाळी नित्याचे आन्हिक गंगा किनारी झाले की, श्रीस्वामी महाराज झोपडीत दार बंद करून बसत. दुपारी भिक्षेच्या वेळी पुन्हा मध्यान्ह स्नान करून ते तीन घरी भिक्षेला जात. तो पर्यंत झोपडीचे दार उघडे असे. पुन्हा संध्याकाळपर्यंत दार बंद असे.
तेथील प्रसिद्ध अशा श्रीराम मंदिरात दररोज पुराण होत असे. श्री स्वामी महाराज पुराण ऐकण्यास एका ठराविक जागी खांबाला टेकून बसत. ते कुणाशीच बोलत नसत. एकदा तीन दिवस पुराणिकबुवांचे पुराण ऐकल्यावर स्वामी महाराज नम्रपणे त्यांना म्हणाले “उद्या पुराण संपल्यावर आम्ही एक श्लोक सांगू का?” पुराणिकबुवांनी ते मान्य केले व सर्व श्रोतुवर्गाला उद्या श्री स्वामी महाराज श्लोक सांगणार असल्याचे सांगितले.
दुसऱ्या दिवशी पुराणानंतर श्री स्वामी महाराजांनी गीतेचा एक श्लोक घेऊन त्या आधाराने पुराण सांगितले. त्यांची रसाळ वाणी व वक्तृत्व यामुळे लोक फार प्रभावित झाले. पुराणिकबुवा सुद्धा अति भारावून गेले व म्हणाले आमचे पुराण सांगणे आम्ही आजपासून बंद करतो. आमचे चातुर्मास आज संपले. उद्यापासून या व्यासपीठावर आपण बसावे!” त्या प्रमाणे तेथे रोज श्री स्वामी महाराजांचे पुराण होऊ लागले. नित्य नवीन नवीन लोक पुराण ऐकण्यास येऊ लागले. त्याचप्रमाणे ज्योतिष याज्ञिक वेदान्त योग इत्यादी विविध विषयांच्या अभ्यासाकरिताही लोक श्रीस्वामी महाराजांकडे येऊ लागले.
श्री स्वामी महाराजांचा ब्रह्मवार्तास एकूण दीड वर्ष मुक्काम झाला. वर्णाश्रम धर्माविषयी लोकांच्या मनात प्रेम उत्पन्न झाले व श्री स्वामी महाराजांची कीर्ती फार दूरवर पसरली. ती कीर्ती ऐकून ग्वाल्हेर येथील एक महापंडित श्री गोपाळचार्या आपल्या शिष्यमंडळीसह श्रीस्वामी महाराजांच्या दर्शनाला आले. त्यांना वेदान्त ग्रंथातील काही शंका विचारायच्या होत्या. पुराण चालू असताना ते मंदिरात आले. एका बाजूस जाऊन उभे राहिले. त्यांना पाहताच श्रीस्वामी महाराजांनी पुराण संपविले व त्यांना घेऊन ते आपल्या आश्रमात गेले. बाकीची मंडळी बाहेर उभी होती. आश्रमाचे दार बंद करून दुसऱ्या दिवशी श्री गोपालचार्या श्री स्वामी महाराजांचा निरोप घेऊन परत गेले.
याच काळात श्री स्वामी महाराजांनी श्री दत्तात्रेय प्रभूंच्या आज्ञेने “श्रीदत्तपुराण” हा संस्कृत ग्रंथ रचला. पुराणग्रंथ म्हटल्यावर सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित अशी पाच लक्षणे त्या ग्रंथात आढळून यावी लागतात. या ग्रंथामध्ये पहिल्या अष्टकांत सर्गाचे वर्णन आहे. दोन ते सात अष्टकांत वंश मन्वंतर इत्यादी विषय आहेत. आठव्यात प्रतिसर्गाचे वर्णन एकंदर श्लोकसंख्या साडेतीन हजार असून त्यावर श्री स्वामी महाराजांची विस्तृत टीका आहे. आठ अष्टके आहेत. ग्रंथात ज्ञान उपासना कर्म याचे विवेचन आहे. एकूण रचना ऋकसंहिते प्रमाणे आहे. ऋकसंहितेतील प्रत्येक अध्यायातील आरंभ व श्रीदत्त पुराणांचा आरंभ एकसारखाच आहे. पहिल्या अध्यायातील प्रत्येक श्लोकांत एक दोन असे अल्पाद घालून स्तुती केलेली आहे. यालाच “वेदपादस्तुती” असे म्हणतात. हा अप्रतिम ग्रंथा ब्रह्मवर्त येथे गंगातीरी निर्माण झाला.
























































