
>> निळकंठ कुलकर्णी
।। श्री गुरुदेव दत्त ।।
।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।
महत्पूरहून प. प श्रीस्वामी महाराज सारंगपुरला आले. एका मंदिरात त्यांचा मुक्काम होता. नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळी प.प श्रीस्वामी महाराज काहीजणांचे शंका-समाधान करीत होते. त्या लोकांबरोबर केशवराव नावाचे देवी- डॉक्टरही तेथे आले होते. ते गृहस्थ अत्यंत नास्तिक असून, देवाधर्माची व साधुसंतांची टिंगलटवाळी करीत असत. आल्याआल्या त्यांनी श्रीस्वामी महाराजांना उभ्याउभ्याच नमस्कार केला व ते दूर जाऊन बसले श्रीस्वामी महाराजांनी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहून, “काय काम आहे ?” असे विचारले. त्या वेळी ते गृहस्थ म्हणाले; ” मी पुण्याचा ! माझे नाव केशव बळवंत भट मी कऱ्हाडे ब्राह्मण असून, देवी- डॉक्टर आहे. आज आपण आमच्याकडे भिक्षेला यावे, अशी माझ्या आईची ईच्छा आहे !”
श्रीस्वामी महाराज म्हणाले, “तुम्ही ब्राह्मण आहात असे म्हणता, पण तुमच्या चालण्या- बोलण्यावरून तुम्ही ब्राह्मण आहात असे दिसत नाही. ब्राह्मणधर्म पाळत का? स्नान – संध्या , नैवेद्य वैश्वदेव वैगरे घरी करता का?”, “नाही यांपैकी मी काहीच करीत नाही. कारण मला त्यासाठी वेळच मिळत नाही. आमच्या पेशाच्या लोकांना असले उपद्व्याप करून कसे चालेल ?” केशवराव म्हणाले त्यांच्या प्रत्येक शब्दातून उर्मटपणा जाणवत होता.
श्रीस्वामी महाराज म्हणाले, ” आपण ब्राह्मणधर्म पाळत नाही, हे सांगायला सुद्धा तुम्हांला काही लाज वाटत नाही? असल्या धर्मभ्रष्ट माणसांकडे आम्ही भिक्षेला कसे येणार ?” हे ऐकताच ते पुन्हा उर्मटपणे म्हणाले; “तेवढ्यानेच जर आपले अडत असेल तर आजच्यापुरता कोणाकडून तरी नैवेद्य, वैश्वदेव करून घेऊ मग तर आमच्याकडे भिक्षेचे आमंत्रण आपण स्वीकाराल मी नाही?” श्रीस्वामी महाराज रागाने कठोर शब्दांत म्हणाले; “किती निर्लज्ज आहात हो तुम्ही? तुमच्यासारख्यांचे तोंडही पाहण्याची माझी इच्छा नाही; मग तुमच्याकडे भिक्षा घेणे तर दूरच राहिले!”
ती घडलेली हकिकत त्यांनी घरी येऊन आपल्या आईला सांगितली. आईनेही त्यांची चांगली कानउघडणी केली ती म्हणाली “श्रीस्वामी महाराज आपल्याकडील भिक्षा घेत नाहीत. मग आपण कसले ? एवढेही धर्मकार्य माझ्या प्रारब्धात नाही?” हे सर्व ऐकून केशवरावानांही पश्वाताप होऊन फार वाईट वा’ श्रीस्वामी महाराज आपल्या घरी येतील असेच आपण वागायचे, ठरवून ते श्रीस्वामी महाराजांकडे आले आणि अगदी काकुळतीने म्हणाले, “महाराज, मी चुकलो ! मी महादोषी आहे . आपल्याशिवाय मला कोण पदरात घेणार? यापुढे आपण सांगाल तसेच मी वागेन. आपले चरण मी सोडणार नाही!” त्यांची आईही त्यांच्या पाठोपाठ आलीच होती. तीही म्हणाली; “महाराज! माझ्या या मुलाला पदरात घ्या. त्याला ब्रह्मकर्म शिकवा आणि तो सर्व ब्रह्मकर्म करायला लागल्यावरच आमच्या घरी भिक्षेला येण्याची माझी इच्छा पुरी करा!” पुढे त्या केशवरावांच्या स्वभावात आमूलाग्र बदल झाला. ते सर्व ब्रह्मकर्म शिकले व त्यानंतरच श्रीस्वामी महाराज त्यांच्या घरी भिक्षेस गेले.