
प्रसाद नायगांवकर, यवतमाळ
यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा धरण तुडूंब भरले आहे. गेला आठवडाभर यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार आहे. मुसळधार पावसामुळे निळोणा धरण पूर्ण भरले असून हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी यवतमाळ शहरातील नागरिकांनी धरणाकडे धाव घेतली होती. गेल्या वर्षी पाऊस तुलनेनं कमी झाला होता, ज्यामुळे यावतमाळकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता.
शहराची तहान भागविण्यासाठी बेंबळा प्रकल्पातून पाणी आणण्याचं ठरवण्यात आलं होतं, मात्र हा प्रयत्न फसला होता. नगर पालिका आणि सामाजिक संस्थानी टँकरने जनतेची तहान भागवण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकांच्या पाण्याच्या मागणीपुढे पुरवठा अत्यंत कमी असल्याने हे प्रयत्नही फारसे यशस्वी झाले नव्हते. अशा परिस्थितीत हे धरण पूर्ण क्षमतेनं भरल्याने यवतमाळकरांनी आता वर्षभर पाण्याची चिंता मिटली असं म्हणत सुटकेचा निश्वास सोडला आहे.



























































