
सामना प्रतिनिधी, अलिबाग
पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा किहिम येथील ‘रुपण्या’ हा बंगला आज 30 किलो डायनामाईट लावून जिल्हा प्रशासनाने उडवला. अवघ्या पाच सेकंदात 36 पिलर कोसळून बंगला जमीनदोस्त झाला. या कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल एक कोटीची स्फोटके वापरल्याची चर्चा असून बंगल्याच्या तीनशे मीटरचा परिसर निर्मनुष्य करून ही कारवाई करण्यात आली.
नीरव मोदीचा बंगला ताब्यात घेऊन तो पाडून टाकावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कारवाई सुरू केली. परंतु बंगल्याचे काम अत्यंत मजबूत असल्याने तो तोडण्यास अडथळे आले. अखेर हा बंगला स्फोटके लावून जमीनदोस्त करावा, असा अहवाल तज्ञांनी दिला. रायगड जिल्हा प्रशासनाने त्याची तयारी करून बंगला स्फोटके लावून पाडण्याचे काम मुंबई येथील खिची ब्लास्टिंग कंपनीला दिले.
36 पिलर्सना डायनामाईट बांधले
खिची ब्लास्टिंगच्या कर्मचारी व तज्ञांनी गुरुवारी रात्रीपासून काम सुरू केले. बंगल्यातील पिलरला प्रत्येकी तीन याप्रमाणे 110 होल पाडण्यात आले. एका होलमध्ये दोन डिटोनेटर ठासण्यात आले. साडेसातशे ग्रॅम डिटोनेटरसह एकूण 30 किलो स्फोटके बंगल्याभोवती बांधण्यात आली. शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे काम सुरू होते. बांधलेली स्फोटके तज्ञांकडून पुन्हा एकदा तपासण्यात आली.
रिमोट कंट्रोलचे बटन दाबून स्फोट
जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी व जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, उपजिल्हाधिकारी भरत शितोळे, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, सार्वजनिक बांधकाम उपकार्यकारी अभियंता मधुकर चव्हाण यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी व पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. तीनशे मीटरचा संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात आला. वाहनांनाही बंदी करण्यात आली. त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास बॅटरीच्या सहाय्याने रिमोट कंट्रोलचे बटन दाबून पाच सेकंदांत स्फोट घडवून बंगला जमीनदोस्त करण्यात आला.
बंगल्यातील सामान ईडीच्या ताब्यात
हा बंगला पाडण्यासाठी साधारणपणे एक कोटीच्या आसपास खर्च आला असून कोसळलेले बांधकाम उचलून नेण्यासाठी अजून काही खर्च जिल्हा प्रशासनाला येणार आहे. हा बांधकामाचा ढिगारा उचलून नेण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असून त्यानंतर येथील जमीन पूर्णतः मोकळी होईल. बंगल्यातून बाहेर काढलेले सामान अंमलबजावणी सक्त संचालनालयाला देण्यात येणार आहे.




























































