
दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणातील चार दोषींना एकाच वेळी फासावर चढवण्याच्या आग्रहाला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या चारही दोषींना एकत्रितपणे फासावर चढवण्याचा आग्रह नको. कारण तांत्रिकदृष्टय़ा ते शक्य नाही. त्यामुळे या चौघांना वेगवेगळी फाशी द्यावे अशी भूमिका घेत केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी न्यायालयाच्या त्रिसदस्यीय घटनापीठासमोर केंद्राच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यावेळी घटनापीठाने याचिकेवरील सुनावणी 11 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.
Supreme Court posts for February 11 the appeal of Central government against Delhi High Court’s order rejecting its plea to separately execute the death row convicts in the December 2012 Delhi gang-rape case. https://t.co/dWHW7J81dC
— ANI (@ANI) February 7, 2020
केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. ‘निर्भया’च्या चारही दोषींना एकाच वेळी फाशी द्यावी असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिला होता. त्याला केंद्राचा आक्षेप आहे. कारण कायदेशीर आणि तांत्रिक बाजूंचा विचार करता या चारही दोषींच्या क्युरेटिव्ह याचिका आणि दया याचिका एकाच वेळी निकालात निघणे शक्य नाही. त्यामुळे ज्याचा अपिलाचा मार्गच आता संपलाय त्या मुकेशला प्रथम फासावर चढवावे असे केंद्राचे म्हणणे आहे. त्या याचिकेवर केंद्र सरकारच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही. रामण्णा, न्या. संजीव खन्ना आणि न्या. कृष्णा मुरारी यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली.


























































