फाशी टाळण्यासाठी ‘निर्भया’च्या मारेकऱयाचा आटापिटा, मानसिक स्थिती ठीक नसल्याचा कांगावा

543

निर्भयावरील अमानुष अत्याचारातील चारही दोषींची फाशीची शिक्षा जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा दोषींचा वाचण्यासाठी आटापिटा सुरू झाला आहे. आता त्यांना 3 मार्च रोजी फासावर लटकविले जाण्याचे नक्की झालेले असतानाच दोषी विनय शर्मा याने तिहार कारागृहात भिंतीवर डोके आपटून घेतले आहे. त्यामुळे त्याला किरकोळ जखम झाली असून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा कांगावा त्याच्या वकिलाने केला आहे.

रविवारी दुपारी कारागृहातील 3 नंबरच्या सेलमध्ये बंद असलेल्या विनयने आपले डोके भिंतीवर आपटून घेतले. डोक्याला जखम झाल्यानंतर तो आपल्या आईलाही ओळखू शकत नाही. त्याच्या वकिलाने त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्याची विनंती याचिकेद्वारे केली आहे. विनयला सिजोफ्रेनिया नावाचा विकार झाला असून त्याला उपचाराची गरज आहे, असे त्याचे वकील ए. पी. सिंह यांनी कोर्टात गुरुवारी सांगितले. पटियाला हाऊस कोर्टाने या याचिकेवर लगेच सुनावणी घेत तिहार जेल प्रशासनाला विनयवर तत्काळ उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.

निवडणूक आयोगाकडे धाव
निर्भयावरील अत्याचार आणि त्यानंतर हत्या प्रकरणातील दोषी विनय शर्मा याचे वकील ए. पी. सिंह यांनी त्याची फाशी टाळण्यासाठी आणखी एक डाव टाकला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत अर्ज दाखल केला आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांनी 29 जानेवारीला राष्ट्रपतींकडे विनयची दयायाचिका फेटाळण्याची शिफारस केली तेव्हा ते मंत्रीही नव्हते आणि आमदारही नव्हते, असा आरोप त्यांनी या अर्जात केला आहे. दुसरे म्हणजे सत्येंद्र जैन यांनी 30 जानेवारी रोजी आपले मत व्हॉटस्ऍपच्या द्वारे पाठवले होते. अशा स्थितीत दयायाचिका फेटाळणे बेकायदेशीर आणि कायद्याच्या विरुद्ध आहे असेही विनयच्या वकिलांनी म्हटले आहे. कारण त्या वेळी दिल्लीत निवडणूक प्रक्रिया सुरू होती.

आपली प्रतिक्रिया द्या