तुमच्या सारख्यांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही, निर्भयाच्या आई इंदिरा जयसिंगांवर संतापल्या

3161
nirbhaya mother

सोनिया गांधीप्रमाणे वागून निर्भयाच्या दोषींना माफ करावं, या ज्येष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंग यांच्या ट्वीटवर निर्भयाच्या आईने सणसणीत उत्तर दिलं आहे. तुमच्यासारख्या लोकांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही, अशा शब्दात निर्भयाच्या आई आशा देवी यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.

इंदिरा जयसिंग यांनी निर्भयाच्या आईवडिलांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की ज्या पद्धतीने सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांची मारेकरी नलिनीला माफ केलं आणि तिला फाशी देऊ नये अशी मागणी केली होती तसंच निर्भयाच्या मातापित्यानेही करावे. या ट्वीटविषयी विचारणा झाल्यानंतर आशा देवी यांनी अतिशय तीव्रपणे जयसिंग यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, या मला असा सल्ला देणाऱ्या इंदिरा जयसिंग कोण होतात? मला कळत नाही की इंदिरा यांची मला असा सल्ला देण्याची हिंमत तरी कशी होते? संपूर्ण देश दोषींना फाशी व्हावी अशी कामना करत आहे. यांच्यासारख्या लोकांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही. मी कधीच त्या नराधमांना माफ करणार नाही. खुद्द देवाने येऊन जरी मला सांगितलं, तरीही मी त्यांना कधीच माफ करणार नाही, अशा शब्दांत आशा देवी यांनी त्यांचा उद्वेग व्यक्त केला आहे.

‘निर्भया’ सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी चार नराधम गुन्हेगारांविरुद्ध नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. 1 फेब्रुवारीला पहाटे 6 वाजता तिहार तुरुंगात चार नराधमांना फासावर लटकवले जाणार आहे. यापूर्वी 22 जानेवारीला या नराधमांना फाशी देण्यात येणार होती. मात्र कायदेशीर प्रक्रियेमुळे फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलली आहे. चार नराधमांपैकी एक मुकेश सिंहने केलेला दयेचा अर्ज दिल्लीच्या नायब राज्यपालांनी शुक्रवारी फेटाळला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दयेचा अर्ज फेटाळला आहे. तत्पूर्वी मुकेश सिंहने दिल्ली हायकोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. याचिका प्रलंबित असल्याने 22 जानेवारीला फाशीची शिक्षा देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. ही याचिका फेटाळली गेली.

सर्व न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती तिहार तुरुंग प्रशासनाने न्यायालयाकडे दिली. त्यानंतर  पटियाला हाऊस कोर्टाने नवीन डेथ वॉरंट काढले असून 1 फेब्रुवारीला पहाटे सहा वाजता चार नराधमांना फासावर लटकवले जाणार आहे. त्यामुळे मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षयकुमार सिंह आणि पवन गुप्ता या चार गुन्हेगारांना फाशी दिली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या