
दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी पतियाळा न्यायालयात आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणी 18 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील एका आरोपीची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली असून त्या याचिकेवर 17 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्यावी यासाठी निर्भयाच्या आई-वडिलांनी न्यायालयाकडे विनंती केली आहे. निर्भयाच्या आईने आरोपींविरोधात ‘डेथ वॉरंट काढण्याची मागणी कोर्टाकडे केली आहे. तर फाशी टाळावी यासाठी आरोपींकडून पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. आज या प्रकरणातील चार आरोपींपैकी अक्षय कुमार या आरोपीची पुनर्विचार याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यावर 17 डिसेंबरला तीन न्यामुर्तींच्या बेंचसमोर सुनावणी झाल्यावर 18 डिसेंबरला फाशीचे शिक्षेसंदर्भातील याचिकेवर सुनावणी होणार आहे.
दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दोषींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी निर्भयाच्या वकिलांनी न्यायालयाकडे आरोपींच्या फाशीची तारीख निश्चित करण्याची मागणी केली. जेव्हा एखाद्या लहान मुलीवर बलात्कार होतो तेव्हा सगळ संपून जात. पण जेव्हा शिक्षेची वेळ येते तेव्हा मानकाधिकारच्या घोषणा देत अनेक संस्था उभ्या राहतात, अशी खंतही निर्भयाच्या आईने न्यायालयात व्यक्त केली.
प्रशासन डोळे बंद करून बसलंय
‘मी न्यायालयाला सांगणार आहे की, आमच्या भावना आणि अश्रूंकडे पाहून निर्णय देऊ नका. पण आमच्या मुलींसोबत काय होतंय हे पहा. सात वर्षानंतरही परिस्थिती बदललेली नाही. आजही मुलांना जाळून मारलं जात असून प्रशासन डोळे बंद करुन बसलं आहे. – आशा देवी, निर्भयाची आई





























































