प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘निर्भया’ पथक; गेल्या पाच वर्षांतील आरोपींवर वॉच

महिलांच्या सुरक्षेची मुंबई पोलिसांनी  गंभीर दखल घेतली आहे. महिलांवर अत्याचार होऊ नयेत, तसे करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘निर्भया’ पथके तैनात करण्याचे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहे.

अंधार, निर्जनस्थळे तसेच महिला प्रसाधनगृहे असलेल्या ठिकाणी गस्त वाढविण्याबरोबर रहदारीच्या ठिकाणी, रेल्वे स्थानके, बस डेपो परिसरात ‘निर्भया’ पथकाची आता प्रभावी गस्त राहणार आहे. यासाठी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या असून त्यानुसार महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना

  • प्रत्येक पोलीस ठाण्यात वुमन सेफ्टी सेलची स्थापना
  • प्रत्येक प्रादेशिक विभागाचे एक महिला सहाय्यक निरीक्षक किंवा निरीक्षक या संबंधित प्रादेशिक विभागांतर्गत पोलीस ठाण्यांच्या ‘निर्भया’ पथकाच्या नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार
  • प्रत्येक पोलीस ठाण्यातील मोबाईल-5 हे गस्ती वाहन ‘निर्भया’ पथक म्हणून काम करणार आहे.
  • ‘निर्भया’ पथकात एक महिला सहाय्यक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक, एक महिला व पुरुष अंमलदार व चालक असतील.
  • रात्रीच्या वेळी एकटीने प्रवास करणाऱया महिलेने मदत मागितल्यास त्यांना योग्य ठिकाणी पोहचविण्याकरिता मदत करणार आहे.
  • पोलीस ठाणे हद्दीत एकटे राहणाऱया ज्येष्ठ नागरिक महिलांची यादी तयार करून गस्तीदरम्यान त्यांची भेट देणार आहेत.
  • गेल्या पाच वर्षांतील शहरातील महिला, मुली, तरुणी, लहान बालकांचे लैंगिक शोषण करणाऱया आरोपींची यादी तयार करून त्यांच्यावर वॉच ठेवणार आहेत.

तज्ञांकडून मार्गदर्शन, समुपदेशन करणार

‘निर्भया’ पथकाव्यतिरिक्त पोलिसांनी ‘एम पॉवर’ या संस्थेच्या सहभागातून ‘सक्षम’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातंर्गत महिलाविरुद्ध गुह्यातील पीडित महिला, पोक्सो कायद्यातंर्गत गुह्यातील पीडित, अल्पवयीन मुले-मुली यांना मानसिकदृष्टय़ा सशक्त करण्याकरिता तसेच अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना योग्य मार्गदर्शन गुह्यातून परावृत्त करण्याकरिता मानसोपचारतज्ञांकडून समुपदेशन करण्यात येणार आहे.

निर्भया तक्रार पेटी

शाळा, महाविद्यालये, महिलांची वसतिगृहे, येथील महिला व मुलींकरिता ‘निर्भया’ नावाने तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे. त्या पेटीत महिला किंवा मुलींनी त्या पेटीत आपल्या तक्रारीची चिठ्ठी टाकायची असून त्याची ‘निर्भया’ पथक वेळोवेळी दखल घेऊन कारवाई करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या