
सिमेंट पुरविल्याचे पैसे मागण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात गेलेल्या एकाला संबंधितांनी पिस्तूल दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना जुलै 2017 ते मे 2018 कालावधीत सेनापती बापट रस्ता आणि नऱ्हे परिसरात घडली.
याप्रकरणी निर्मिती डेव्हलपर्सच्या पंढरीनाथ सुभाष म्हस्के आणि संतोष सुभाष म्हस्के (दोघेही रा. नऱ्हे ) यांच्याविरूद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश शिवनारायण भुतडा (वय 42 रा. एसबी रोड ) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हस्के हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी 2017 मध्ये प्रकाश भुतडा यांच्याकडून 36 लाख 47 हजारांचे सिमेंट घेतले होते. त्याबदल्यात विश्वास संपादित करून आरोपींनी भुतडा यांची फसवणूक केली. भुतडा हे म्हस्के यांच्या कार्यालयात पैसे मागण्यासाठी गेले असता, आरोपी संतोषने त्यांना पिस्तूल दाखविले. तु जर परत पैसे मागण्यासाठी आला, तर ठोकून टाकील अशी धमकी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत.



























































