गडकरी सुस्साट; अपयशाची जबाबदारी पक्षाध्यक्षांचीच!

89

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री भाजप नेते नितीन गडकरी सुस्साटच आहेत. रोज काही ना काही गंमत जंमत सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला केला. सोमवारी त्यांनी तर पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावरच बॉम्बगोळा टाकला आहे. ‘अपयशाची जबाबदारी पक्षाध्यक्षांचीच असते’ असे म्हणत गडकरींनी भाजपमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाने भाजप मौनात गेला आहे. या अपयशाला जबाबदार कोण, याचे उत्तर चिंतन शिबिरातून शोधण्याचे काम सुरू असतानाच नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्ष सुनावले. राजकारणात अपयशाची जबाबदारी घेणारे नेतृत्व हवे, असे गडकरी म्हणाले. याच्या ‘बातम्या’ होताच गडकरी पत्रकारांवरच घसरले आणि जे बोललो नाही ते माझ्या नावावर का खपवता, असा सवाल त्यांनी विचारला.

आता निशाण्यावर दोघेही

दिल्लीत गुप्तचर विभागाचा कार्यक्रम होता. यावेळी व्यासपीठावरून गडकरींनी बॉम्बगोळा टाकला. ते म्हणाले, मी जर पक्षाध्यक्ष असेन आणि माझ्या पक्षाचे आमदार, खासदार चांगले काम करत नसतील तर त्याची जबाबदारी कुणाची असेल? माझीच असेल. अर्थात गडकरी एवढय़ावरच थांबले नाहीत. त्यांची गाडी सुपरफास्ट निघाली. ते म्हणाले, तुम्ही उत्तम वक्ते असलात म्हणजे तुम्हाला निवडणुकीत विजय मिळेलच असे नाही. तुम्ही खूप हुशार आहात म्हणून तुम्हाला लोक मते देतील असेही नाही. माणसाने पहिल्यांदा विनम्र असायला हवे. आत्मविश्वास आणि अहंकार यातील फरक ओळखता आला पाहिजे. आत्मविश्वास नक्कीच हवा, पण अहंकाराला दूर ठेवा, असे आवाहन गडकरींनी केले. गडकरींचा हा सारा रोख मोदी आणि अमित शहा यांच्याकडेच होता असे आता बोलले जात आहे.

आत्मविश्वास आणि अहंकार यातील फरक ओळखता आला पाहिजे. आत्मविश्वास नक्कीच हवा, पण अहंकाराला दूर ठेवा- गडकरी

आपली प्रतिक्रिया द्या