
2020 च्या विधानसभा निवडणुकीत युती असतानाही भारतीय जनता पक्षाने जनता दल-युनायटेड (जेडीयू) विरुद्ध कारस्थान केले, असा गंभीर आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज केला. भाजपला विरोध करणारे पक्ष एकत्र आले तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवू शकतात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जेडीयूच्या पाटणा येथे आयोजित अधिवेशनात नितीश कुमार बोलत होते. मागील निवडणुकीत आपल्या पक्षाला भाजपमुळेच समाधानकारक कामगिरी करता आली नाही, असेही ते म्हणाले. आमच्या पक्षाला याआधी 2005 आणि 2010 च्या निवडणुकीत कधीच कमी जागा मिळाल्या नव्हत्या हे भाजपला माहीत होते. त्यामुळे 2020 च्या निवडणुकीत त्यांनी आमचे उमेदवार पराभूत कसे होतील याची काळजी घेतली, असे नितीश कुमार म्हणाले. आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, पण भाजपच्या आग्रहामुळे आपण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जनतेसमोर आलो होतो, असे ते पुढे म्हणाले.
‘केंद्रातील भाजपा सरकारकडून बिहारला काहीच मिळाले नाही. विशेष राज्य म्हणून दर्जा देण्याची आमची मागणी स्वीकारली गेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या राज्यातून येतात ते ब्रिटिशांच्या काळापासून समृध्द राज्य आहे. पण गरीबातल्या गरीबाचा जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत राष्ट्र प्रगती करणार नाही,’ असे नितीश कुमार यावेळी म्हणाले.


























































