
उत्तर प्रदेशमधील जेडीयूच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत त्यांचा पक्ष सहभागी होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘भारत जोडो यात्रा’ हा काँग्रेसचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत, भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी सत्ताधारी महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राजदने देखील अद्याप या यात्रेत सामील होण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
नितीश कुमार म्हणाले की, “भारत जोडो यात्रा हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. आम्ही या यात्रेत सहभागी होणार नाही. काँग्रेसला त्यांचा कार्यक्रम पूर्ण करू द्या, मग आम्ही एकत्र बसून विरोधी एकजुटीवर चर्चा करू.” 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट भाजपचा पराभव करू शकते, असे नितीश कुमार म्हणाले. त्यांना राज्यातील मित्रपक्ष काँग्रेससोबत कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले होते. भाजपच्या विरोधात जास्तीत जास्त पक्षांनी एकत्र यायला हवे, यावर माझा ठाम विश्वास आहे.” असे नितीश कुमार म्हणाले.
या प्रकरणी आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, आमच्या पक्षाची विचारसरणी काँग्रेससारखीच आहे. सर्व राज्यांमध्ये भारत जोडो यात्रेला प्रचंड गर्दी झाली. मात्र आमचा पक्ष यात्रेत सहभागी होण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. तो निर्णय उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव घेतील.” समाजवादी पक्षाने सोमवारी स्पष्ट केले होते की, अखिलेश यादव मंगळवारी उत्तर प्रदेशात दाखल होणाऱ्या या यात्रेत सहभागी होणार नाहीत.


























































