
संयुक्त पुरोगामी आघाडी (जदयू) चे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 12 जून रोजी बिहारमधील पाटणा येथे सर्व विरोधकांची बैठक बोलावली होती. त्यासाठी त्यांनी स्वत: सर्व विरोधकांची भेट घेत आमंत्रण दिले होते. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
बिहारमधील पाटणा येथे 12 जूनला होणारी ही बैठक आता 23 जूनला होणार आहे. ही बैठक पुढे ढकलण्या मागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.मात्र काँग्रेसच्या सांगण्यावरून ही बैठक पुढे ढकलली जात असल्याचे बोलले जात आहे.
भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची भक्कम एकजूट उभारली जात असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू नेते नितीशकुमार हे गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. 12 मे रोजी नितीश कुमार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली.
राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या एकजुटीसाठी नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांनी पुढाकार घेतला आहे. याआधी या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचीही या दोन नेत्यांनी भेट घेतली. मंगळवारीच नितीशकुमार यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेऊन चर्चा केली.



























































