
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र, ते पुढील काही काळ मुख्यमंत्रीपदावर राहणार आहेत. बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नितीश कुमार हे काही दिवसांपूर्वी राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे नियमानुसार त्यांना आमदारकीचा राजीनामा देणे आवश्यक होते. त्यानुसार त्यांनी आज राजीनामा दिला. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ते लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. मात्र, ते आणखी काही दिवस मुख्यमंत्रीपदावर राहण्याची शक्यता आहे. नियमांनुसार त्यांना 6 महिने मुख्यमंत्रीपदावर राहता येईल. तोपर्यंत बिहारमध्ये पुढच्या मुख्यमंत्र्यांचा शोध सुरूच राहणार आहे.



























































