नितीशकुमार यांच्या ‘जदयु’चा निर्णय लोकसभेसाठी भाजपसोबत ;चार राज्यांत स्वबळावर लढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक भाजपसोबत युती करून लढवण्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचा निर्णय बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने घेतला. मात्र राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मणिपूर या राज्यांतील विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवून भाजपला झटका देण्याचीही तयारी चालवली आहे.

संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत झाली. त्यात लोकसभेची निवडणूक भाजपसोबत राहूनच लढवण्याचा निर्णय घेण्यात आला तर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मणिपूर या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपशी युती न करता मैदानात उतरण्याचे ‘जदयु’ने ठरवले आहे.

जागावाटपाचा वाद कायम

‘जदयु’ने लोकसभा निवडणूक भाजपसोबत राहून लढवण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी भाजप आणि जदयु यांच्यातील जागावाटपाचा वाद मात्र कायम आहे. बिहारमधील मागील विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीच्या आधारे लोकसभेचे जागावाटप व्हावे असा जदयुचा आग्रह आहे. अर्थातच, भाजपला हे मान्य नाही.

पासवान यांचाही भाजपला सूचक इशारा

‘एनडीए’मधील सर्वच पक्षांची एकजूट कायम राहील अशी ग्वाही लोकजनशक्ती पार्टीचे नेते, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान एकीकडे देत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे पुत्र खासदार चिराग पासवान यांनी सूचक इशारा देत भाजपची चिंता वाढवली आहे. ‘राजकारणात काहीही घडू शकते. भविष्यात तेजस्वी यादव आणि माझ्यासारखे युवा नेते एकत्र आले तर कोणी हैराण होण्याचे कारण नाही,’ असे चिराग पासवान म्हणाले.

नितीश यांच्या राजवटीत हिंदूंवर दडपशाही

बिहारमधील नितीशकुमार यांच्या राजवटीत हिंदूंवर दडपशाही करण्यात आली आणि त्यांची उपेक्षाही करण्यात आली, असा आरोप करीत भाजपचे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी नितीशकुमार यांच्यावर तोड डागली आहे. त्यामुळे जदयु आणि भाजप यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे.