नितीश कुमारांच्या डीएनएमध्ये धोकेबाजी व अहंकार, मोदींचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि जनता दल (यू) मध्ये ‘तू-तू-मै-मै’ सुरू आहे. उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि जदयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यात ट्विटरवॉर सुरू आहे. दोघेही एकमेकांवर निशाणा साधत आहेत. याच दरम्यान प्रशांत किशोर यांनी सुशील मोदी यांचा जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यात सुशील मोदी नितीश कुमार यांच्या डीएनएमध्ये धोकेबाजी आणि अहंकार असल्याचे म्हणताना दिसतात.

शनिवारी प्रशांत किशोर यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करून भाजप नेते सुशील मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. या व्हिडीओत सुशील मोदी नितीश कुमार यांच्या डीएनएवर बोलताना दिसत आहेत. नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्यानंतर सुशील मोदी यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत जदयूने घेतलेल्या भूमिकेविरोधात प्रशांत किशोर यांनी विधान केले होते. याच दरम्यान सुशील मोदी यांनी एक ट्वीट केले होते. नितीश कुमार ज्या लोकांनी जमिनीवर उचलून खूर्चीवर बसवतात तेच त्यांच्यासाठी त्रासदायक बनतात, असे ट्वीट सुशील मोदी यांनी केले होते. या ट्वीटला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

sushil-modi-prashant-kishor

प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्वीटमध्ये सुशील मोदींना टॅगही केले आहे. एखाद्या व्यक्तीला कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्यात सुशील मोदी यांचा हात कोणी धरू शकत नाही. पाहा ते आधी काय बोलत होते आणि आता उपमुख्यमंत्रीपदावर बसवल्यावर काय म्हणत आहेत, असे कॅप्शन प्रशांत किशोर यांनी दिले आहे. प्रशांत किशोर यांच्या या ट्वीटला अद्याप सुशील मोदी यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.