राममंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांना कोरोना

927

अयोध्येतील रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या आठवडय़ात पार पडलेल्या राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नृत्यगोपाल दास हे मंचावर उपस्थित होते. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलनही केली. नृत्यगोपाल दास यांनी तेव्हा तोंडाला मास्कही लावला नव्हता.

गोकुळाष्टमीनिमित्त नृत्यगोपाल दास हे दरवर्षीप्रमाणे मथुरा येथे आले होते. या वेळी त्यांची प्रकृती बिघडल्याने तातडीने डॉक्टरांना बोलावून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने केलेल्या चाचणीत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. प्रकृती नाजूक असल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला असून सध्या मथुरा येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

योगी आदित्यनाथ डॉक्टरांच्या संपर्कात

महंत नृत्यगोपाल दास कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सतत डॉक्टरांच्या संपर्कात असून प्रकृतीची माहिती घेत आहेत. स्थानिक प्रशासन तसेच मेदांता रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून नृत्यगोपाल दास यांना योग्य ते उपचार देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मोदी, योगी आणि भागवतांचे टेन्शन वाढले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यास ठरावीक लोकांनाच या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मंचावर फक्त पाच लोकांनाच परवानगी होती. यात नृत्यगोपाल दास यांचा समावेश होता. मंचावर वावरत असताना पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आणि सरसंघचालक मोहन भागवत महंत यांच्याजवळ गेले होते. त्यांच्याशी हस्तांदोलनही केले होते. या सोहळ्याच्या सात दिवसांनंतर नृत्यगोपाल दास हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मोदी, योगी आणि भागवत यांचे टेन्शन वाढले आहे. या वेळी राज्यपाल आनंदी पटेलही मंचावर उपस्थित होत्या. या सोहळ्यापूर्वी मंदिराच्या दोन प्रमुख पुजाऱयांनाही कोरोनाची लागण झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या