
विमान प्रवाशांसाठी दिलासादायक वार्ता आहे. विमान प्रवास करताना पसंतीच्या आसन निवडीसाठी आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्र सरकारने विमानातील आसन निवडीच्या शुल्कावर आता मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या विमानातील 60 टक्के आसन निवड ही विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हणजे 60 टक्के आसन निवडीसाठी आता जास्तीचे पैसे द्यावे लागणार नाहीत.
केंद्र सरकारच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांसाठी बुधवारी याबाबतच्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नव्या नियमांनुसार, एकाच पीएनआरवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकत्र बसवण्याची जबाबदारी एअरलाइन्सची असणार आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आता जवळच्या जागा दिल्या जातील. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक चांगला होईल. याबरोबरच नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयामार्फत विमान कंपन्यांना आणखी काही महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.





























































