
दिवाळी सण काही दिवसांवर आला असताना बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱयांना बोनस देण्याबाबत प्रशासन स्तरावरून अद्याप कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे बेस्टचे कर्मचारी संभ्रमात असून त्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी करीत बेस्ट कामगार सेना गुरुवारी वडाळ्यातील बेस्ट बस आगाराबाहेर निदर्शने
करणार आहे.
मुंबई शहर परिसर आणि उपनगरांत बेस्ट उपक्रमाचे जवळपास 23 हजार कायमस्वरुपी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना बोनस देण्याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱयांना 2025चे सानुग्रह अनुदान (बोनस) दिवाळी सणापूर्वी मिळालेच पाहिजे, पालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापकांनी तातडीने निधीचे नियोजन करून कर्मचाऱयांना बोनस द्यावा, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेने केली आहे.
z गुरुवारी दुपारी 1.30 वाजता वडाळ्यात तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. या वेळी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष, आमदार, शिवसेना उपनेते सचिन अहिर, सरचिटणीस नितीन नांदगांवकर आणि मार्गदर्शक गौरीशंकर खोत हे उपस्थित राहून बेस्ट कर्मचाऱयांच्या हक्कासाठी आवाज उठवणार आहेत.