
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
तेलगू देसमसह इतर विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला उद्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार लोकसभेत सामोरे जाणार आहे. मोदी सरकारसाठी ही अग्निपरीक्षाच ठरणार आहे. टीडीपीने दाखल केलेल्या या अविश्वास ठरावाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोदी विरुद्ध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी असा सामना उद्या रंगणार आहे. सरकारकडे पुरेसे बहुमत असले तरी शिवसेना काय भूमिका घेते याकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीमुळे ऐनवेळी गडबड होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा आज दिवसभर बिझी होते.
राजधानीत पडद्यावर व पडद्याआडून दिवसभरात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. भाजपातील नाराज शत्रुघ्न सिन्हा यांची समजूत घालण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले असले तरी दुसरे बंडखोर खासदार कीर्ती आझाद अजूनही बंडाच्या पवित्र्यात असल्याचे समजते. त्यातच ज्या तेलगू देसमने हा अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्या पक्षाचेच एक खासदार दिवाकर रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडूंचा व्हीप झुगारत मतदानाला दांडी मारण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पक्षीय बलाबल पाहता मोदी सरकार बहुमताची परीक्षा पास होईल हे जवळपास निश्चित आहे. मात्र अनेक छोटय़ा पक्षांमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणकोणते खासदार व्हीप झुगारतात याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
यूपी, राजस्थान, बिहारच्या खासदारांनी घाम काढला
उद्याच्या शक्तिपरीक्षणासाठी भाजपने सर्वच खासदारांना मतदानाला उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. तरीही गेल्या चार वर्षांपासून पक्षावर नाराज असलेल्या उत्तर प्रदेश व बिहारच्या खासदारांनी भाजप नेतृत्वाचा घाम काढल्याचे सूत्रांनी सांगितले. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून लोकसभा खासदारांचे अवमूल्यन झाल्याची सर्वच खासदारांमध्ये सार्वत्रिक भावना आहे. त्याचबरोबर सरकारमध्ये कोणतेही काम होत नाही, उलट जनतेतील खासदार असल्याने खर्च वाढतो. त्यामुळे अनेकजण पुढची लोकसभा निवडणूक लढविण्यासही उत्सुक नाहीत. अशा नाराज खासदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी सुरू केला आहे. त्यात प्रामुख्याने यूपीमधील अवध प्रांतातील खासदार पंतप्रधान व शहा यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त आहे.
सरकारची सर्व खाती कामाला
विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढण्यासाठी मोदी सरकार कामाला लागले आहे. गेल्या चार वर्षांतील कामगिरीची आकडेवारी सादर करा असे आदेशच मोदींनी प्रत्येक खात्याला दिले आहेत.
भाजपला साडेतीन तास, काँग्रेसला ३८ मिनिटे
उद्या सकाळी ११ वाजता अविश्वासदर्शक ठरावावरील चर्चेला सुरुवात होईल. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाने चर्चेची सांगता होईल आणि रात्री उशिरा ठरावावर मतदान होईल असे सांगण्यात आले. खासदारांच्या संख्याबळानुसार प्रत्येक पक्षाला बोलण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. संख्याबळ जास्त असल्याने भाजपला ३ तास ३३ मिनिटे, तर काँग्रेसला ३८ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. या ३८ मिनिटांमध्येच राहुल आणि त्यांच्या सहकाऱयांना कमाल करायची आहे. इतर पक्षांमध्ये अण्णाद्रमुक २९, तृणमूल २७, बीजेडी १५, शिवसेना १४, टीआरएस ९, सीपीएम ७, राष्ट्रवादी ६ आणि एलजेपी ५ मिनिटे असे वेळवाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे त्या टीडीपीला १३ मिनिटे बोलण्याची संधी मिळणार आहे.
व्हीप जारी केलेला नाही – शिवसेना
नरेंद्र मोदी सरकारविरोधातील अविश्वासदर्शक ठरावावेळी शिवसेना काय भूमिका घेणार याबाबत देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाकडे लागले आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील शिवसेना हा क्रमांक दोनचा पक्ष असल्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अविश्वासदर्शक ठरावासाठी शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत. शिवसेना काय भूमिका घेणार याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्या (शुक्रवारी) सकाळीच जाहीर करणार आहेत. अविश्वासदर्शक ठरावाबाबत शिवसेनेने कोणताही व्हीप जारी केलेला नाही अशी माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली.
अण्णा द्रमुक सरकारसोबत तर टीआरएस, बीजेडी विरोधात
कावेरी जलवाटपावेळी इतर पक्षांनी साथ न दिल्याने मतदानावेळी मोदी सरकारसोबत राहण्याचा निर्णय अण्णा द्रमुकने घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. जयललिता हयात असताना त्यांनी मोदी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर अण्णा द्रमुकच्या थंबी दुराई यांना लोकसभेचे उपसभापतीपद देण्यात आले. जयललितांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रमुक निर्नायकी झाला असला तरी मोदी सरकारविरोधात अण्णा द्रमुक जाणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी चंद्रशेखर राव यांचा तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष आणि नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल हे पक्षही मतदानावेळी तटस्थ राहतील. त्याचा फायदा भाजपला होईल असे मानले जात आहे.
पक्षनिहाय बलाबल
रालोआ
भाजप – २७३
शिवसेना – १८
लोकजनशक्ती – ६
अकाली दल – ४
इतर पक्ष – ९
एकूण – ३१०
यूपीए
काँगेस – ४८
राष्ट्रवादी काँग्रेस – ७
अण्णा द्रमुक – ३७
तृणमूल काँगेस – ३४
बिजू जनता दल – २०
तेलगू देसम – १६
तेलंगणा राष्ट्र समिती – ११
माकपा – ९
समाजवादी पार्टी – ७
आम आदमी पार्टी – ४
राष्ट्रीय जनता दल – ४
वायएसआर काँगेस – ४
व इतर छोटे पक्ष – २४

























































