‘एनआरसी’ असावी, पण सध्या तरी त्यावर निर्णय नाही! भाजपा प्रवक्त्याने केले स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Sudhanshu Trivedi is a leader of BJP

देशामध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) असावी असे भारतीय जनता पार्टीचे मत आहे. पण सध्या तरी त्याबद्दल काहीच निर्णय झालेला नाही, असे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी स्पष्ट केले आहे.

‘आसाममधील एनआरसी ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून केली जात आहे आणि ती राष्ट्रीय स्तरावर करण्याचा सध्या तरी काहीच निर्णय न झाल्याने त्यावरून वाद निर्माण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्यावेळी देशभरात एनआरसी बनवली जाईल त्यावेळी आक्षेप नोंदवा, ते नक्कीच ऐकले जातील.’ असे त्रिवेदी यांनी म्हटले आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या मुद्दय़ावर विरोधी पक्ष समाजकंटकांचा वापर करून देशभरात आंदोलने करत असल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी केला आहे. सीएए कायदा हा देशातील नागरिकांसाठी नाही तर परदेशातून आलेल्या नागरिकांसाठी आहे. महात्मा गांधीही शेजारच्या राष्ट्रांमधून आलेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याच्या बाजूने होते असे त्रिवेदी यांनी म्हटले आहे.

गेल्या साडेपाच वर्षात 566 मुस्लिमांना नागरिकत्व

मुस्लिमांनाही नागरिकत्व देण्यात येणार असल्याचे सांगत त्रिवेदी यांनी नागरिकत्व कायदा मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप फेटाळून लावला. गेल्या साडेपाच वर्षांत 566 मुस्लिमांना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्यात आल्याची माहिती देतानाच त्रिवेदी यांनी त्यात पार्श्वगायक अदनान सामी याचे उदाहरणही दिले.