
पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या 45 रुग्णांना वैद्यकीय अधिकारीच नसल्याने शुक्रवारी उपचाराविना माघारी फिरण्याची वेळ आली. उपजिल्हा रुग्णालयात एकूण सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून उपचार मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. या घटनेने संतप्त झालेल्या रुग्णांनी रुग्णालयाला टाळे ठोकत निषेध व्यक्त केला.
तालुक्यातील विविध गावातून शुक्रवारी सकाळी आलेल्या 45 रुग्णांनी स्वतःच्या तपासणीसाठी केस पेपर काढले. दुपारी 12 वाजले तरीही त्यांची तपासणी झाली नसल्याने तेथील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. आज नियुक्तीवर असलेले डॉक्टर आले नसल्याने तुमची तपासणी होणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यानंतर ही घटना सामाजिक कार्यकर्ते अण्णा हरेर,शाहनवाज शेख यांना कळताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या घटनेने संतप्त झालेल्या रुग्णांसह हरेर व शेख यांनी रुग्णालयाच्या गेटला टाळे ठोकत आपला निषेध व्यक्त केला. या रुग्णालयात प्रसूतीसाठी तालुक्यातील पत्र्याचा तांडा येथून शीतल पवार ही महिला आली होती. मात्र, तिला फक्त दाखल करून घेण्यात आले. तर निर्मला भिसे या महिलेचा लहान मुलगा तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असून या मुलाला शुक्रवारी तपासण्यात आले नाही. फुंदे टाकळी येथून अभिजित फुंदे लहान मुलाला घेऊन आले होते. मात्र, त्यांनाही उपचार मिळाले नाहीत. अशीच अवस्था सर्व 45 रुग्णांची झाली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर नसल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील सर्व रुग्णांना घरी जाण्यास सांगितल्याने उपचाराविना रुग्णां घरी जावे लागले.
येथील उपजिल्हा रुग्णालयाविषयी रुग्णांच्या अनेक तक्रारी असून काही कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून येथे आहेत. रुग्णांना वेळेवर उपचार न मिळणे, औषधांचा तुडवडा या नित्याच्या बाबी झालेल्या आहेत. डॉ. जेजुरकर यांची आज रुग्ण तपासणीसाठी नियुक्ती होती. मात्र त्यांची प्रभारी असलेली ऑर्डर रद्द झाल्याने ते नगरला गेले होते. तर येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ आव्हाड रीतसर रजा टाकून बाहेरगावी गेले होते. जेजुरकर यांच्या जागी तातडीने दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे होते. मात्र ढिसाळ कारभारामुळे तातडीने दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नसल्याने रुग्णांचे खूप हाल झाले. या विषयावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण मिटिंगमध्ये असल्याचे सांगितले. नगर येथील रुग्णसंपर्क अधिकारी डॉ. किशोर चाबुकस्वार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लगेचच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवत असल्याचे सांगितले. दुपारी 1 वाजेनंतर एक वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात आले. मात्र, तोपर्यंत सर्व रुग्ण घरी गेले होते.




























































