बाप्पा पावला! ई–पासचे विघ्न टळले! एसटीने गावी चला!

1140

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्य़ा चाकरमान्यांसाठी खूशखबर आहे. राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा करीत  गावी जाणाऱ्य़ा चाकरमान्यांची 14 दिवसांच्या क्वारंटाइनमधून सुटका केली आहे. हा कालावधी आता 10 दिवसांवर आणण्यात आला असून एसटीतून जाणाऱ्य़ा चाकरमान्यांना ई पासचीही गरज लागणार नाही. कोकणात 3 हजार एसटी बसेस सोडण्यात येणार असून त्यांचे आरक्षणही सुरू करण्यात आले आहे.

कोकणात जाणाऱ्य़ांसाठी ग्रामपंचायतींनी 14 दिवस क्वारंटईनची अट घातल्याने मुंबईकरांमध्ये नाराजी होती. हे 14 दिवसांचे क्वारंटईन 10 दिवसांवर आणत त्यांनी होम क्वारंटाइन करण्याची घोषणा गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. त्याचबरोबर एसटी बसने गावी जाणाऱ्य़ांना ई पासची गरज लागणार नाही. एसटी हाच तुमचा ई-पास आहे. पोर्टलमध्ये नोंद असल्याने प्रवाशांची सर्व माहिती आमच्याकडे उपलब्ध असणार आहे, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी जाहीर केले.

ग्रुप बुकिंगने थेट गावात; अतिरिक्त भाडे नाही

कोकणात जाणाऱ्य़ा चाकरमान्यांनी 22 जणांचे गुप बुकिंग केल्यास त्यांना थेट गावापर्यंत एसटीने जाता येईल. प्रवासी क्षमतेपेक्षा 50 टक्केच प्रवासी एसटीत बसणार असून त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाहीत. एसटी रस्त्यात कुठेही थांबणार नाही. प्रवाशांना जेवण घरुनच घ्यावं लागणार आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.

अधिक पैसे आकारल्यास खासगी चालकांकर कारवाई

गर्दीच्या वेळी खासगी बसेसकडून अधिकचे भाडे आकारून  प्रवाशांची  लूटमार केली जाते. मात्र त्यांना एसटीपेक्षा दीडपटच पैसे घेण्याचा अधिकार आहे. त्याव्यतिरिक्त कोणी जास्त पैसे घेतल्याची तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल. कोकणात लोक जातील आणि आपला गणेशोत्सव साजरा करतील. यासाठी सरकारने हे धोरण तयार केले आहे; पण लोकांनी कोकणात गेल्यावर गर्दी करु नये, असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे.

12 ऑगस्टनंतर स्वॅब टेस्ट देऊन गावी जाता येणार

अनेकांनी आम्हाला 12 तारखेनंतर कोकणात जायचं असल्याची विनंती केली आहे. त्यांच्यासाठी नवे नियम असून 12 तारखेनंतर जाणाऱ्य़ांना जाण्याच्या 48 तास आधी स्वॅब टेस्ट करुन घ्यावी लागणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच त्यांना परवानगी  देता येणार आहे. हा रिपोर्ट प्रशासनाकडे दिल्यानंतर जाण्याची परवानगी  दिली जाईल, असे अनिल परब यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या