पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची गॅरंटी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

१९ जुलै रोजी जाहीर होणाऱया अकरावीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागांमध्ये घट होणार आहे. अल्पसंख्याक, इनहाऊस आणि मॅनेजमेंट कोट्य़ातील रिक्त जागा मिळून या यादीसाठी २ लाख १२ हजार ५९३ जागा होत्या, पण आता न्यायालयाच्या आदेशानुसार यातील कोट्य़ातील जागा ऑनलाइनला न वापरता त्या पुन्हा कॉलेजच्या ताब्यात द्याव्या लागणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जात नोंदवलेल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची गॅरंटी उरलेली नाही.

दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम भरताना विद्यार्थ्यांनी कोट्य़ातील उपलब्ध जागा गृहीत धरल्या आहेत. यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जात अल्पसंख्याक कॉलेजचा पर्याय निवडला आहे, मात्र आता या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अल्पसंख्याक कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नसल्याने अशा विद्यार्थ्यांचे वांदे होणार आहेत. दुसऱ्या यादीसाठी एकूण किती जागा पुन्हा कॉलेजना सरेंडर कराव्या लागणार आहेत. याविषयी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या गोंधळात आणखीनच भर पडणार आहे. शिवाय १९ जुलैला दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेश कधी घ्यायचे हे देखील अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.