
आगामी सार्वत्रिक निवडणुकांवर डोळा ठेवत राज्य सरकारने यंदा रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे घर खरेदी करणाऱयांना सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारकडून दरवर्षी 1 एप्रिलपासून रेडी रेकनर दरात सुधारणा केली जाते. 1 एप्रिपासून सुरू होणाऱया 2023-24 या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनर दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जे दर लागू होते तेच कायम राहणार असल्याचे महसूल विभागाचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांनी आज जारी केलेल्या आदेशावरून लक्षात येते. रेडीरेकनरचे दर कायम ठेवल्याने बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाविकास आघाडी सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात सरासरी 5 टक्के वाढ केली होती. यात मुंबई वगळता इतर महापालिका क्षेत्रात 8.80 टक्के वाढ, तर ग्रामीण भागात 6.96 टक्के, तर नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 3.62 टक्के वाढ करण्यात आली होती. मुंबईत ही वाढ सरासरी 2.64 टक्के, ठाण्यात हा दर 9.5 टक्के, तर पुण्यात 6 टक्के आणि नवी मुंबई 99 टक्के करण्यात आला होता. कोरोनामुळे सरकारने 2019-20 मध्ये दर वाढवले नाहीत. 2022-21 मध्ये सुरुवातीला दर वाढवले नाहीत, परंतु सप्टेंबरमध्ये 1.7 टक्क्यांनी दर वाढवले होते.
रेडी रेकनर दर कसा असतो
नोंदणी आणि मुद्रांक विभाग हे बांधकाम आणि जमिनींच्या खरेदी-?विक्री व्यवहाराच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आकारते. त्यासाठी संबंधित जमीन व इमारतीचे वेगवेगळ्या निकषानुसार आणि विभागानुसार वार्षिक बाजारमूल्य ठरविले जाते. त्यालाच रेडी रेकनर असे म्हणतात. रेडी रेकनर दर हा वेगवेगळ्या शहरा किंवा भागात वेगवेगळा असतो. रेडी रेकनर दर हा किमान दर आहे, ज्याच्या आधारावर सरकार त्या भागातील मालमत्तेशी संबंधित व्यवहारासाठी नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क आकारते.
42 हजार कोटींचा महसूल
2022-23 मध्ये महसूल विभागाने मुद्रांक व नोंदणी शुल्काव्दारे 35 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. पण प्रत्यक्षात 42 हजार कोटी रुपये महसूल सरकारला मिळाला.

























































