
योगेश वाघ । पुणे
२७ सप्टेंबरला झालेल्या कालवाफुटीमुळे दांडेकर पूल वसाहतीतील नागरिकांचे संसार अक्षरश: होत्याचे नव्हते झाले. हातावर पोट असणाऱ्या या नागरिकांचे दैनंदिन व्यवहार मोडक्या घरात थोडीफार डागडुजी होऊन सुरू झाले आहेत. या संकटावर मात तर केली, मात्र आता नवरात्रोत्सव तोंडावर आला असताना, मोडक्या आणि उद्ध्वस्त झालेल्या घरात घटस्थापना कशी करावी? असा प्रश्न या वसाहतीमधील महिलांना पडला आहे.
मुख्यत्वे सोलापूर, नगर, बीड, धाराशिव, सातारा येथील मूळचे रहिवासी असलेल्यांचा दांडेकर पूल वसाहतीत समावेश आहे. ज्यांच्या घरात पाणी घुसून थोडक्यात निभावले, त्यांनी घटस्थापनेची तयारी सुरू केली आहे. तर, ज्यांची घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली, त्यांच्यासमोर घरच नाही, तर घट कुठे बसवावेत? असा प्रश्न पडला आहे.
धुणी-भांडी करणाऱ्या स्मिता दिवटे म्हणाल्या, ‘गेल्या ३० वर्षांपासून आमच्या घरी घट बसतात. दुर्घटनेला १० ते १५ दिवस झाले. मात्र, तरीही घर झालेले नाही. घटाचे महत्त्व स्वतःच्याच घरात असते. घरच नाही, तर घट कुठून बसवू? कालव्यातील पाण्यामुळे घरातले धान्य भिजून त्याला जागेवरच कोंब आले. तेच माझ्या देवीचे घट मी समजते. घर मिळाले तर शेवटचे पाच दिवस मी घट बसविणार आहे.’
कुमिंदा कदम या विवाहापासून येथे राहतात. गेल्या ३५ वर्षांपासून त्यांच्या घरात घट बसतात. कालवा दुर्घटनेमुळे त्यांच्या घराचा केवळ पाया शिल्लक आहे. कदम म्हणाल्या, ‘दरवर्षी नऊ दिवस उपवास करून पायात चप्पल न घालता आम्ही नवरात्र साजरी करतो. घरात घट बसतात. मात्र, या वेळेला घराचे अस्तित्वच उरलेले नाही. पाया पडायलासुद्धा घरात देव शिल्लक नाही. देवाने घटस्थापनेच्या वेळेला बेघर केले. या वर्षी परंपरा खंडित होईल, याची भीती आहे. मात्र, माझा देवावर विश्वास आहे. ज्याने बेघर केले, तो घर देईल, अशी अजूनही आशा आहे.’ मूळच्या नगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील सत्यभामा निकसे या राशिनच्या यमाई देवीच्या भक्त आहेत. सत्यभामाबाई म्हणाल्या, ‘परंपरेत खंड पडला तर परत घट बसविता येत नाही, अशी लोकभावना आहे. माझे पूर्ण घर या दुर्घटनेत वाहून गेले आहे. तरीही मी माझ्या मोडक्या घरात घट बसविणार आहे. परंपरेत खंड पडू देणार नाही. माझी देवीवर पूर्ण श्रद्धा आहे. ती माझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही. हीच माझ्या परीक्षेची वेळ आहे.’
मूळच्या बार्शी तालुक्यातील धुणीभांडी करणाऱ्या सुनंदा गायकवाड म्हणाल्या, ‘दरवर्षी आम्ही घरातील कपडे, अंथरूण-पांघरूण धुऊन नवरात्रीच्या तयारीला लागतो. घरातील भांडी लख्ख करतो. रंगरंगोटी करून घराला देवळासारखे सजवितो. मात्र, या वर्षी या सर्व गोष्टींना आम्ही मुकलो आहोत. घटाचा दिवा नऊ दिवस तेवत ठेवावा लागतो. अशा छत नसलेल्या घरात घट बसविणे आणि त्याचे पावित्र्य राखणे अशक्य आहे. त्यात पाऊस आला तर सगळेच अघटित होईल.’
शेजारच्यांना उत्सवात सहभागी करून घेणार!
सुनंदा गायकवाड यांच्या जाऊबाई श्यामल गायकवाड म्हणाल्या, ‘आमच्या घराचे फारसे नुकसान झालेले नाही. त्यामुळे मी चिखल आणि राडारोडा बाहेर काढून घट बसवायची तयारी सुरू केली आहे. मी येथे राहायला आल्यापासून आम्ही सर्व नवरात्र जोरात साजरी करायचो. आम्ही सर्व मिळून पुण्यातील देवींच्या मंदिरांना अनवाणी दर्शनाला जायचो. खूप उत्साह असायचा. माझ्या घरात घट बसत असले, तरी माझ्या शेजारच्यांना घट बसविता येत नाही, या गोष्टीचे अपार दु:ख आहे. या सर्वांना आम्ही आमच्या उत्सवात सामील करून घेणार आहोत. त्यामुळे त्यांची घरे उभी राहणार नसली, तरी देवीच्या भक्तीची उणीव त्यांना भासणार नाही.’ राणी कदम म्हणाल्या, ‘आमच्या वस्तीत महिला सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करतात. या वर्षी अजून आमची तयारी सुरू झालेली नाही. कालवा दुर्घटनेमुळे या वर्षी खंड पडण्याची भीती आहे. या दुर्घटनेत देवीच्या कृपेने जीवितहानी झाली नाही. त्यामुळे छोट्या प्रमाणावर का असेना, आम्ही सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करणार आहोत.’

































































