मुंबईकरांच्या मुस्कटदाबीचे गूढ कायम, गळती सापडत नसल्याने यंत्रणाही हैराण

381

चेंबूर-घाटकोपरपासून बोरिवली-दहिसरपर्यंतच्या अनेक भागांत गॅस गळतीचा दुर्गंध येऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. गुरुवारी रात्रीपासून हा प्रकार सुरू झाल्याने विविध भागातील नागरिकांनी पोलीस, पालिका आणि संबंधित गॅस कंपन्यांकडे शेकडो तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेच्या अग्निशमन दलासह आपत्ती निवारण यंत्रणांनी  तक्रारी आलेल्या ठिकाणी तपासणी केली असता कोणत्याही ठिकाणी ‘गॅस गळती’ आढळली नाही. त्यामुळे या ‘गूढ’ गॅस गळतीमुळे यंत्रणाही हैराण झाली आहे.

गुरुवारी रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागांत गॅस लिकेज झाल्यासारखा दुर्गंध येऊ लागला. घाटकोपर, कांजुरमार्ग, मानखुर्द, देवनार, चेंबूर, घाटकोपर, पकई, हिरानंदानी, चकाला, विलेपार्ले, कांदिवली, बोरिवली, दहिसर अशा विविध भागांत असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. त्यामुळे रहिवाशांनी तातडीने मुंबई अग्निशमन विभाग, महानगर गॅस, मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन कक्ष, पोलिसांकडे तक्रारी केल्या. तक्रारी प्राप्त होताच अग्निशमन दल, महानगर गॅस व पालिकेच्या कर्मचार्‍यांनी तातडीने संबंधित ठिकाणी धाव घेऊन तपासणी सुरू केली. पालिकेच्या अग्निशमन दलाने अत्याधुनिक हॅजमॅट वाहनांच्या सहाय्याने गॅस गळती तपासणी केली, मात्र एकाही ठिकाणी गॅस गळती झाल्याचे आढळले नाही. शुक्रवारी दिवसभर मुंबईच्या विविध भागांत गॅस गळती झाल्याचा शोध घेतला जात होता, मात्र कुठेही गॅस लिकेज सापडले नाही.

सोशल मीडियावर अफवा पसरवू नका

गुरुवारी रात्रीपासून गॅस गळती सुरू होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाल्याच्या बातम्या पसरल्या. त्यामुळे संपूर्ण मुंबईत रहिवाशांमध्ये घबराट पसरली. त्यामुळे पालिकेने मुंबईत कुठेही गॅस लिकेज झाले नसल्याचे स्पष्ट करताना नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. गॅस लिकेजच्या तक्रारींनुसार संबंधित सर्व ठिकाणी काटेकोरपणे तपासणी करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गुरुवारी रात्री गॅस गळती झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आपत्कालीन टीमने तत्काळ धाव घेऊन याचा शोध घेतला, मात्र कोणत्याही ठिकाणी पाइपलाइनमध्ये गळती आढळली नाही. महानगर गॅसच्या पाइपलाइन सुस्थितीत आहेत. – नीरा अस्थाना, मुख्य व्यवस्थापक, महानगर गॅस लिमिटेड

‘आरसीएफ’ चेंबूर, ‘महानगर’मध्येही गळती नाही

राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर, (आरसीएफ) चेंबूर प्लांटमध्ये गॅस गळती झाल्याचा अंदाज नागरिकांनी वर्तकला होता, मात्र पालिकेने यात तथ्य नसल्याचे ट्विट करून स्पष्ट केले आहे.

‘आरसीएफ’मध्ये गॅस गळती झाल्याची ऑनलाइन तक्रार आली होती, मात्र या ठिकाणी तपासणी केली असता गळती झाली नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. काही ठिकाणी गॅस लिकेजचा वास येत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे तपासणी सुरू असल्याचेही पालिकेने म्हटले आहे. महानगर गॅसनेही आपल्या सर्व पाइपलाइन तपासल्या असून कोणही गळती नसल्याचे स्पष्ट केले आहे.   

आज तातडीची बैठक

मुंबईत गॅस गळतीच्या आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शनिवारी दुपारी गॅस कंपन्यांची महत्त्वाची बैठक बोलावली असून संबंधित कंपन्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पालिकेने गॅस गळतीच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ‘एनडीआरएफ’लाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पालिकेच्या आपत्कालीन विभागात गुरुवारी रात्री 8.30 वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी 1.30 वाजेपर्यंत 34 तक्रारी दाखल झाल्या, तर पोलीस खात्याकडे सुमारे 100, महानगर गॅस कंपनीसह संबंधित कंपन्यांकडे नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या