
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आदी व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविणाऱया खासगी महाविद्यालयांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) फेऱया पूर्ण होईपर्यंत मॅनेजमेंट कोटय़ाचे प्रवेश राबविता येणार नाही. उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाने याविषयीचे आदेश महाविद्यालयांसाठी जारी केले आहेत. कॅप प्रवेश फेरी अगोदरच मॅनेजमेंट कोटय़ाचे प्रवेश बेकायदेशीरपणे केल्यास त्या प्रवेशांना प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून मान्यता मिळणार नाही. त्यामुळे राज्यातील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) प्रसिद्ध केलेल्या नियमानुसार प्रवेश पूर्ण करावेत, असेही संचालनालयाने म्हटले आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) फेऱया झाल्यानंतर गुणवत्ता याद्या तयार करून खासगी महाविद्यालयातील जागा भरण्याचा नियम आहे. मात्र अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आदी व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यापूर्वीच राज्यातील खासगी महाविद्यालयांनी मनमानी पद्धतीने त्यांच्या व्यवस्थापन कोटय़ातील जागा भरल्याची तक्रार सीईटी सेलकडे करण्यात आली. बेकायदा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून मान्यता मिळणार नसल्याचे सीईटी सेलचां आयुक्त महेन्द्र वारभुवन यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांना पत्राद्वारे कळविले आहे.
– डीटीईच्या अखत्यारितील महाविद्यालयांना नियमानुसार व्यवस्थापन कोटा प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था 2017 नियम 13मधील तरतुदीनुसार संस्थातरीय कोटय़ातील जागा (मॅनेजमेंट कोटा), अल्पसंख्याक कोटय़ातील जागा आणि केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहणाऱया जागांवर प्रवेश प्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे सीईटी सेलच्या परिपत्रकातील नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश महाविद्यालयांना एक परिपत्रक काढून संचालनालयाने दिले आहेत.

































































