मास्क न लावता फिरणाऱयांना तुरुंगात निबंध लिहिण्याची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या काळात शहरात मास्क न लावता फिरणाऱया 18 नागरिकांची रवानगी मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर प्रशासनाने खुल्या तुरुंगात केली. शनिवारी पोलिसांनी या बेफिकीर नागरिकांना रूपसिंह स्टेडियममधील खुल्या तुरुंगात आणून त्यांना कोरोना आणि त्यावरील प्रतिबंधाच्या उपायांवर निबंध लिहायला लावले. तात्पुरत्या तुरुंगात या नागरिकांना तीन तास स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते. ग्वाल्हेर प्रशासनाने शहरात कोरोना प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून पोलीस आणि आरोग्य कर्मचारी मास्क न लावता फिरणाऱया बेफिकीर नागरिकांना पकडून खुल्या तुरुंगात आणून टाकत आहेत. या नागरिकांना दंड ठोठावण्याऐवजी तीन तास थांबवून कोरोनावर निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात येत आहे.