2022 पर्यंत नव्या फार्मसी महाविद्यालयांना बंदी

227

देशातील फार्मसी महाविद्यालयांची कामगिरी सध्या सुमार दर्जाची असून फार्मसी पदवीधरांसाठी पुरेसे रोजगारही उपलब्ध नाहीत. त्यामुळे नव्या फार्मसी महाविद्यालयांना 2022 पर्यंत मान्यता न देण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून इंजिनीयरिंग महाविद्यालयांमधील हजारो जागा रिक्त राहत होत्या. त्यामुळे एआयसीटीईने पुढील दोन वर्षे नव्या इंजिनीयरिंग महाविद्यालयांना मान्यता न देण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वीच घेतला होता. आता एआयसीटीईने नव्या फार्मसी महाविद्यालयांकडे आपला मोर्चा वळवला आहे. गेल्या बुधवारी नवी दिल्ली येथे यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

– देशातील फार्मसी संस्थांची प्रवेश क्षमता गेल्या तीन वर्षांमध्ये 49.5 टक्क्यांनी वाढली. चालू वर्षीच ही टक्केवारी 28.1 टक्के इतकी होती. 2017-18 मध्ये देशात पदवी आणि पदविका अभ्यासक्रम चालवणाऱया फार्मसी संस्था 1809 होत्या. त्या 2019-20 मध्ये वाढून 3276 झाल्या. इंजिनीयरिंग संस्थाही अशाच वेगाने वाढल्या होत्या. परंतु विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी आणि पदवी घेतल्यानंतर त्यांना मिळणाऱया नोकरीच्या संधी समाधानकारक नसल्याचे एआयसीटीईच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.

नव्या महाविद्यालयांसाठी देशभरातून 900 अर्ज
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) फार्मसी संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा आणि सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यानंतरच नव्या महाविद्यालयांना हिरवा कंदील दिला पाहिजे, असा सल्ला एआयसीटीईने दिला आहे. यंदाच्या वर्षी नव्या महाविद्यालयांसाठी 900 अर्ज आले. त्यातील सर्वाधिक 565 अर्ज उत्तर प्रदेशमधून आले. महाराष्ट्र त्याबाबतीत दुसऱया क्रमांकावर आहे. सध्या महाराष्ट्रात 480 फार्मसी संस्था आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या